संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने बँकेच्या कर्जाला कंटाळून गावातील नाल्यात बुडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सात वाजता निदर्शनास आली असून मृतकाचे नाव नामदेव चिंधुजी खुरपडी वय 75 वर्षे रा. गादा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक अल्पभूधारक शेतकरी असून यांच्या हक्काची साडे तीन एकर शेती आहे तसेच महालगाव गावातील आयसीआयसीआय बँकेचे साडे तीन लक्ष रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाला कंटाळून मागील काही दिवसांपासून नैराश्येत होते.एकीकडे शेतीने दिलेला दगा व दुसरीकडे बँकेच्या कर्जाचा अधिकाऱ्याकडून वसुलीचा तगादा यावर कंटाळून सदर मृतक शेतकरी काल सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे गुरांचा चारा घेण्यासाठी घराबाहेर पडले मात्र बराच वेळ होऊन रात्र झाली तरी घरी न परतल्याने घरमंडळींनी बराच वेळ शोधाशोध करून कुठूनही थांगपत्ता लागला नाही मात्र तोच आज सकाळी गावातील नाल्याजवळ सदर मृतकाचे अंगातील कपडे, चप्पल दिसून आल्याने सर्वांना एकच धक्का बसला यावर पोलिसांना माहिती देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवाडे व सहकारी पोलिसांनी तसेच सरपंच सचिन डांगे , युवराज चौधरी यांनी घटनास्थळ गाठून नाल्याची पाहणी करीत मृतदेह बाहेर काढण्यात यश गाठले. पोलिसांनी त्वरित या घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करीत मृतदेहाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एकुलता एक मुलगा, सहा मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.