कठीण परिश्रमातून स्वतःला सिद्ध करा  – डॉ. कवीरायनी इंदिरा प्रियदर्शनी यांचे प्रतिपादन

-जागतिक महिला दिनानिमित्ताने विद्यापीठात राष्ट्रीय परिषद

नागपूर :-घरासोबतच कार्यालयाची जबाबदारी देखील महिला सांभाळत आहे. महिलांना सर्वच क्षेत्रात संधी मिळत आहे. त्यामुळे महिला म्हणून कठीण परिश्रमातून स्वतःला सिद्ध करा, असे प्रतिपादन बार्क रसायनशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख, मुंबई विद्यापीठाच्या यूएम-डीएई सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सच्या ‌‌ प्रोफेसर डॉ. कवीरायनी इंदिरा प्रियदर्शनी यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने दि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, इंडिया (नासी) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार, १४ मार्च व बुधवार १५ मार्च २०२३ दरम्यान दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या गणित विभागातील डॉ. सी. व्ही. रमण सभागृहात मंगळवार, १४ मार्च रोजी परिषदेचे उद्घाटन करताना डॉ. कवीरायनी बोलत होत्या.

‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लैंगिक समानता’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत पुढे बोलताना डॉ. कवीरायनी इंदिरा प्रियदर्शनी यांनी सर्वच क्षेत्रात पुढे जाण्याची महिलांमध्ये क्षमता असल्याचे सांगितले. प्रत्येक क्षेत्रात महिलेसोबत दुजाभाव झाला आहे. कामे करू शकणार नाही म्हणून योग्य संधी त्यांना मिळाली नाही. मात्र, आज सर्वच क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली. विविध क्षेत्रात पुढे येण्यासाठी महिलांनी देखील आव्हाने स्वीकारली पाहिजे. इस्रोची कमान देखील महिला शास्त्रज्ञ सांभाळत असल्याचे त्या म्हणाल्या. कठीण परिश्रम घेऊन केलेल्या कर्तुत्वाने स्वतःला सिद्ध केल्यास संस्थेत देखील तुमचे कौतुक होईल. सर्वस्व महिलांमध्ये प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची क्षमता असल्याचे डॉ. कवीरायनी म्हणाल्या. विद्यापीठ गीत व दीपप्रज्वलन करून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते, प्रमुख अतिथी म्हणून बार्क रसायनशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख, मुंबई विद्यापीठाच्या यूएम-डीएई सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सच्या ‌‌प्रोफेसर डॉ. कवीरायनी इंदिरा प्रियदर्शनी, नासी नागपूर चाप्टरचे अध्यक्ष डॉ. एन.एस. गजभिये, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, संयोजक डॉ. आरती शनवारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य यांनी डिजिटल युगाला महिला कशा सामोरे जातील याबाबत माहिती दिली. आतापर्यंत मिळालेल्या जागतिक पुरस्कारात महिलांची टक्केवारी, शिवाय उच्च शिक्षणात महिला शिक्षकांची टक्केवारी अत्यंत कमी असल्याने चिंता व्यक्त केली. महिलांना डिजिटल कौशल्य प्राप्त करून देणे मोठी समस्या असल्याचे त्या म्हणाल्या. नासी नागपूर चाप्टरचे अध्यक्ष डॉ. एन. एस. गजभिये यांनी नासी (एनएसएसआय) या संस्थेबाबत माहिती दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

महिलांना संधी मिळणे काळाची गरज – कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी

महिला आणि पुरुषांमधील असमानता दूर करण्याकरिता युनायटेड नेशन्सने ध्येय निश्चित केले आहे. लैंगिक समानता त्यातील हे एक ध्येय आहे. त्यामुळे महिलांना संधी मिळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. देशात संस्कृतीमुळे महिला पुढे येत नाही ही बाब वेगळी आहे. स्वातंत्र्यानंतर महिलांना शैक्षणिक क्षेत्रात उशिरा संधी मिळाली. त्यामुळे महिलांची संख्या कमी आहे. मात्र, शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात पुढे येत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानच नव्हे तर आता महिलांना सर्वत्र संधी मिळत आहे. महिलांमध्ये मोठी क्षमता असून त्यांना योग्य दिशा हवी आहे. दोन दिवसीय परिषदेने महिलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे कुलगुरू म्हणाले. उद्घाटन या कार्यक्रमाचे संचालन डॉ. नेहा यादव यांनी केले तर आभार परिषदेच्या संयोजक डॉ. आरती शनवारे यांनी मानले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com