– बॉटनिकल गार्डनच्या लोकार्पण सोहळ्यात ना. मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक
चंद्रपूर :- एखादे काम हाती घेतले की पूर्ण शक्ती पणाला लावून ते पूर्णत्वास नेणारे मंत्रीमंडळातील माझे वरीष्ठ सहयोगी सुधीरभाऊ हे दूरदृष्टी लाभलेले लोकप्रतिनिधी आहेत, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक केले.
चंद्रपूर येथील विसापूर बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या अमृत २ योजने अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, डॉक्टर जितेंद्र रामगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून ना. सुधीरभाऊंचा गौरव केला त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘सुधीरभाऊंसारखे दूरदृष्टी लाभलेले लोकप्रतिनिधी चंद्रपूरला लाभले, हे जिल्ह्याचे भाग्य आहे. प्रत्येक विषयाची जाण असलेल्या सुधीरभाऊंनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली,’ असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रालयांमार्फत होणाऱ्या कामांचेही कौतुक केले. ‘यापूर्वीच्या कार्यकाळात अर्थमंत्री असताना आणि आता वनखाते व सांस्कृतिक खात्याचे नेतृत्व करताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.
त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे वन खाते व सांस्कृतिक खाते बहरले आहे.’ यावेळी मुख्यमंत्र्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक जाणीवांचाही आवर्जून उल्लेख केला. ‘सुधीरभाऊंनी सांस्कृतिक कार्य विभागाला एक ऊर्जा दिली आहे. आपल्या संस्कृतीची, परंपरांची जोपासना कशी करायची, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन कसे करायचे, याचा पाठच सांस्कृतिक विभागाने घालून दिला आहे. सुधीरभाऊंच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि कामातील सातत्यामुळे हे शक्य झाले आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.