नागपूर :-नरखेडला जाणार्या एसटी बसचे अचानक एअरलॉक झाल्याने इंजिनमधून डिझेलचा पुरवठा बंद झाला आणि बस बंद पडली. प्रवाशांना उतरवून दुसर्या बसने रवाना करण्यात आले. ही घटना सोमवार 15 मे रोजी सायंकाळच्या सुमारास सीताबर्डी पोलिसठाण्याजवळ घडली. वर्दळीचा मार्ग असल्याने काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे एअर लॉक झाल्याचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.
एमएच-40-एक्यू 6453 या क्रमांकाची बस सायंकाळी 4.30 वाजता सुमारे 25 प्रवाशांना घेऊन गणेशपेठ आगारातून नरखेडसाठी निघाली. काही वेळातच ती मोरभवन स्थानकात पोहोचली. बसमध्ये बहुतांश प्रवासी काटोल आणि नरखेडचे होते. सीताबर्डीमार्गे बस झीरो माईलकडे निघाली असता अगदी पोलिस ठाण्याजवळ बसचे एअर लॉक झाले. डिझेल पुरवठा खंडीत झाल्याने बस थांबली. त्याच वेळी व्हेरायटी चौकातील वाहतूक सिग्नल सुरू झाल्याने भराभरा वाहने निघाली. आधीच वर्दळीचा मार्ग त्यातच बंद पडलेल्या बसला सुरक्षित स्थळी लावण्यासाठी काही वेळ लागला. त्यामुळे मागाहून येणार्या वाहनांची गर्दी झाली. काही वेळानंतर मार्ग मोकळा झाला.
बस थांबताच प्रवासी खाली उतरले. चालक आणि वाहकाने बस बंद पडल्याची माहिती विभाग नियंत्रकाला दिली. दुसरी बस पोहोचेपर्यंत प्रवासी थांबून होते. तासाभरात दुसरी बस आली. त्यातून प्रवाशांना रवाना करण्यात आले. बंद पडलेल्या बसला गणेशपेठ डेपोत आणण्यात आले. बसच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे.