चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेने अवैध बांधकामावर कारवाई केली असुन कोनेरी तलाव,बाबुपेठ व नागपूर रोड येथील एकुण ४ बांधकामे जेसीबी व अतिक्रमण पथकाच्या मदतीने काढण्यात आले आहे. कोनेरी तलाव जवळील जेलच्या मागील परीसरात गफ्फुर वल्द शेख अलमुद्दीन यांचे घराचे अवैध बांधकाम, हुडको कॉलनी बाबुपेठ येथील चरण पोरटे यांचे पहिल्या माळ्यावरील अवैध बांधकाम,सुरेश डाबरे यांचे टिनाच्या शेडचे व बाथरूमचे अवैध बांधकाम व नागपुर रोडवरील अमित व अभिषेक येरगुडे यांचे २ मजली इमारतीचे अंदाजे क्षेत्रफ़ळ ११०० चौरस फूटाचे अवैध बांधकाम असल्याचे तक्रार महानगरपालिका प्रशासनास प्राप्त झाली होती.
मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता बांधकाम हे अवैधरीत्या केले असल्याचे आढळून आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांना मनपा कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ अन्वये नोटीस बजाविण्यात आली तसेच बांधकाम स्वतः हुन हटविण्याविषयी वारंवार सूचना देण्यात आल्या. परंतु अवैध बांधकामधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे पोलीस पथकाच्या संरक्षणात बांधकाम काढण्यात आले.
शहरातील अवैध बांधकामाची वाढती प्रकरणे पाहता आयुक्त यांनी अश्या बांधकामांवर सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने तिन्ही प्रभागाचे सहायक आयुक्त यांनी कार्य सुरु केले असुन अवैध बांधकाम – अतिक्रमण यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाणार आहे. सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त सचिन माकोडे,नरेंद्र बोभाटे, सहायक नगर रचनाकार सारिका शिरभाते,राहुल भोयर,आशिष भारती यांनी केली. यावेळी मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.