चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण म्हणजे भारताच्या स्वदेशी बनावटीच्या क्षमतेचा पुनरुच्चार आणि विक्रम साराभाई यांच्या स्वप्नाची पूर्तता आहे- केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह

“हे शक्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार”

“हे प्रक्षेपण म्हणजे भारताची क्षमता आणि अचूकता यावरील विश्वासाची पुष्टी आहे”

भारतमाता पुढील 25 वर्षांच्या अमृतकाळात प्रवेश करत असताना 21 व्या शतकात उदयाला येणाऱ्या जागतिक परिस्थितीत वैश्विक नेतृत्वाची भूमिका बजावण्याचा तिने संकल्प केला आहेः डॉ.जितेंद्र सिंह

नवी दिल्ली :- चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण म्हणजे भारताच्या स्वदेशी बनावटीच्या क्षमतेचा पुनरुच्चार आणि विक्रम साराभाई यांनी सहा दशकांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, अंतराळ विभाग, अणुऊर्जा विभाग डॉ. जितेंद्र सिंह, कार्मिक , सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. ते काल श्रीहरिकोटा येथे चांद्रयान-3च्या प्रक्षेपणानंतर बोलत होते. विक्रम साराभाई यांनी सहा दशकांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नांची ही पूर्तता देखील आहे, ज्यांच्याकडे कदाचित संसाधनांची कमतरता होती, पण आत्मविश्वासाची कमतरता नव्हती, त्यांचा स्वतःवर आणि भारताकडे असलेली अंगभूत क्षमता आणि कौशल्यावर विश्वास होता, असे जितेंद्र सिंह म्हणाले. “ हे प्रक्षेपण म्हणजे भारताची क्षमता आणि अचूकता यावरील विश्वासाची पुष्टी आहे”, त्यांनी सांगितले.

भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या इस्रोच्या चमूचे आभार मानताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीहरिकोटाचे दरवाजे खुले केल्याबद्दल आणि भारताच्या अंतराळ क्षेत्राला सुविधा दिल्याबद्दल आभार मानले.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलेल्या ‘स्काय ईज नॉट द लिमिट’ या वाक्याचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की पंतप्रधानांच्या या शब्दांना अनुसरून चांद्रयान-3 आज आकाशाच्या मर्यादांच्या पलीकडे ब्रह्मांडाच्या शोध न लागलेल्या क्षितीजांचा शोध घ्यायला गेले आहे.

यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी एका कवितेची ओळ ऐकवत सांगितले, “ हा भारतासाठी गौरवास्पद क्षण आहे आणि हा इतिहास घडवण्यामध्ये सहभागी असलेल्या श्रीहरिकोटा येथील आपल्या सर्वांसाठी भाग्यशाली क्षण आहे.”

आपल्या निवेदनाचा समारोप करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “भारतमाता पुढील 25 वर्षांच्या अमृतकाळात प्रवेश करत असताना 21 व्या शतकात उदयाला येणाऱ्या जागतिक परिस्थितीत वैश्विक नेतृत्वाची भूमिका बजावण्याचा तिने संकल्प केला आहे.”

यानंतर एका वार्ताहर परिषदेला संबोधित करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांनी अंतराळ क्षेत्र खाजगी उद्योगांना खुले केल्यामुळे आवश्यक असलेली सर्व प्रकारची महत्त्वाची सामग्री आणि संसाधने उपलब्ध करून देणारी पूरक व्यवस्था निर्माण झाली आहे आणि ज्ञान आणि निधी यामध्येही ताळमेळ निर्माण झाला आहे. चांद्रयान-3 ही मोहीमेत देखील या उद्योगांचे मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.

त्यापूर्वी एलव्हीएम3 एम4 हा प्रक्षेपक श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी अवकाशात झेपावला आणि चांद्रयान-3 चे त्याच्या अचूक कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केले, ज्यामुळे या यानाने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. या यानातील सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असल्याचे इस्रोने सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवीन सांस्कृतिक धोरण निश्चितीसाठी कालबद्ध कार्यक्रम - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Sat Jul 15 , 2023
नवी दिल्ली :-  मराठी भाषिक केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देश-विदेशात वास्तव्यास असून मराठी संस्कृतीचे जतन व संवर्धन करीत आहेत तसेच अन्य भाषिकांपर्यंत आपली संस्कती पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. नवीन सांस्कृतिक धोरण निश्चितीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. राजधानी स्थित महाराष्ट्र सदनच्या बॅंक्वेट हॉलमध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची बैठक सांस्कृतिक कार्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com