– नागपूरच्या विणकर सेवा केंद्रामार्फत 22 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा हस्तकला प्रदर्शन – ताना बानाचे आयोजन
नागपूर :- विणकारांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहे . क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, विपणनाची योजना, ट्रेड फॅसिलिटी, विमा अशा विविध योजनांचा यात समावेश आहे. विणकारांचा पारंपारिक व्यवसाय अबाधित राहिला पाहिजे आणि त्यांना रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे याच उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकार या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त गोरक्ष गडलीकर यांनी आज केले.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या विणकर सेवा केंद्रामार्फत आज 18 ऑक्टोबर पासून ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे जिल्हा हस्तकला प्रदर्शन ‘ताना बाना’चे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त गोरक्ष गडलीकर, यांच्या हस्ते झालेयाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विणकर सेवा केंद्र नागपूरचे उपसंचालक एस.पी. ठुबरीकर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या ‘वोकल फॉर लोकल ‘ या अंतर्गत खादीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण देशभरात खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नागपूरातील ‘ताना बाना ‘ प्रदर्शन हे याच खादी महोत्सवाचा भाग आहे. या प्रदर्शनात हात मागाद्वारे निर्मित टसार, , नागपूर कॉटन साडी, कॉटन करवती साडी, चंदेरी साडी, वाराणसी साडी, कॉटन बेड सीट, फर्निशिंगचे कापड प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध असतील.हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत खुले राहणार आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विणकर सेवा केंद्र नागपूरचे सहाय्यक संचालक महादेव पवनीकर यांनी केले.