अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे उपद्रव शोध पथकाला निर्देश
नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक आता सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या अधिक कठोर कारवाई करणार आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सोमवारी (१०) उपद्रव शोध पथक जवानांच्या बैठकीत उपरोक्त निर्देश दिले. यावेळी उपायुक्त (घनकचरा व्यस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, पथक प्रमुख वीरसेन तांबे प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा मुख्यालय येथील सभाकक्षात आयोजित बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघवी करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर सुद्धा कारवाई करणे गरजेचे असल्याचे सांगितले. नागरिकांनी किंवा दुकानदारांनी कचरा गाडीवाला स्वच्छता दूताला दिला तर बाजारपेठेत स्वच्छता राखण्यात मोठी मदत होईल. त्यांनी नागरिकांना स्वच्छता ऍपचा सुद्धा वापर करण्याचे आवाहन केले. नागरिकही आपल्या मोबाईलवर ऍप डाउनलोड करून आपली तक्रार नोंद करू शकतील. या तक्रारीचे निवारण मनपातर्फे लवकरात लवकर केले जाईल. त्यांनी सांगितले की, शोध पथकाचा माध्यमाने नागरिकांमध्ये आणि दुकानांमध्ये जनजागृती केली जाईल. त्यांना स्वच्छता ऍप आणि उपद्रव शोध पथकाच्या दंडाच्या रक्कमेची कल्पना दिली जाईल. यानंतरही बाजारपेठेत कचरा दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यांनी दुकानदारांना आपल्या दुकानात हिरवी आणि निळी कचरा कुंडी ठेवण्याचे आवाहन केले. या कचरा कुंड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा गोळा केला जाईल. त्यांनी सांगितले की, वेद फाऊंडेशन सोबत महानगरपालिकेने MOU केला असून त्यांचे माध्यमातून रोटरी क्लब, स्वच्छ संगठन यांचे सर्व सदस्य याकरीता सेवा देत आहेत. स्वच्छता अभियानात ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन, तेजस्विनी महिला मंडळ, रोटरी क्लब, सारख्या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळत आहे. शहरातील सर्व नागरिकांनी जबाबदारपणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे ठरविल्यास नागपूर शहर सुद्धा स्वच्छता रँकिंगमध्ये उच्चांक गाठू शकतो.
बैठकीत उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर उपस्थित होते.
उपद्रवाचे प्रकार व प्रस्तावित प्रशासकीय शुल्क
कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे रु. 100/-
दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे रु. 400/-
शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे रु. 1000/-
दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब, इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे रु. 2000/-
मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे रु. 2000/-
सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणे रु. 1000/-
रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे रु. 1000/-
चिकन सेंटर, मटन विक्रेते यांनी त्यांच्या कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी टाकणे रु. 1000/-
वर्कशॉप, गॅरेजस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे रु. 1000/-
मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग निर्माते, विक्री करणारे, स्टॉक करणारे इत्यादींची महाराष्ट्र अविघटनशिल कचरा नियंत्रण अधिनियम 2006 नुसार कार्यवाही
फुटपाथ, पथारी टाकून, हातगाडींवर व्यवसाय करणारे अत्यंत लहान/किरकोळ विक्रेते रु. 400/-
पक्के बांधकाम/दुकान असलेले व्यवसायीक रु. 2000/-