‘धनुष्य-बाणा’चे मत नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविणार
महायुतीची सावनेर-नरखेड येथे जाहीर सभा
सावनेर :- रामटेक ही प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, प्रगतीची आहे आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. रामटेक लोकसभेत उमेदवार असलेला सामान्य कार्यकर्ता राजू पारवेंची नाही तर या देशाच्या विकासाला आणि प्रगतीवर नेणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे जागरूक राहा आणि महायुतीला विजयी करा, राजू पारवेंच्या धनुष्यबाणाला दिलेल मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत आहे. येणाऱ्या 19 तारखेला रामटेकच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हाथ बळकट करा, असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रामटेक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री नरेखडच्या दुर्गा माता मंदिर तसेच सावनेर येथील नेहरू मार्केट, बाजार चौकात महायुतीची भव्य प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
याप्रसंगी माजी खासदार कृपाल तुमाने, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, रामटेक लोकसभा निवडणूक क्षेत्राचे महायुतीचे शिवसेना उमेदवार राजू पारवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, माजी मंत्री सुबोध मोहिते, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष (भाजपा) सुधाकर कोहळे, माजी आमदार आशीष देशमुख, भाजपचे जेष्ठ नेते चरणसिंग ठाकूर, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, शिवेसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार आदि नेत्यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रचार सभेला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन एकता मंच, रासप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, सदस्य तथा पदाधिकारी, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्ष, नगर सेवक-सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीच्या जाहिर नाम्यात देशातील युवा, महिला, शेतकरी आणि गोरगरीबांच्या विकासाची प्रतिबद्धता दिसून येते. ७० वर्षांपुढील नागरिकांना पाच लाखापर्यंत उपचार मोफत करुन देण्याबाबतचा निर्णय देशाचे आरोग्य आणखीन सुदृढ बनवेल. देशातील ८० कोटी गरीब जनतेला सध्या केंद्राकडून मोफत धान्य दिले जात आहे. येत्या पाच वर्षांत ही योजना कायम ठेवण्यात येणार असून याबरोबरच रेल्वे, रस्ते निर्मिती आणि पायाभुत सविधांचा विकासाचे कार्य येत्या काळात आणखीन वेगाने करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्त्वात देशाने उल्लेखनीय प्रगती केली आहे, असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आताचे सरकार फेस टू फेस काम करणारे
ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे. एक देशभक्ती, राष्ट्रभक्ती, देशाचा विकास डोळ्यासमोर ठेवून ही महायुती निवडणूक लढत आहे. पूर्वीचे सरकार घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे होते, आताचे सरकार फेस टू फेस काम करणारे आहे, असेही ते म्हणाले. म्हणून मोदीजींना पुन्हा देशाची चावी देण्यासाठी अबकी बार 400 पार आणि राज्यात अबकी बार 45 पार जागा आपल्याला राज्यात मिळवायच्या आहेत. यात राज्यातील निवडूण येणाऱ्या जागांमध्ये तुमचा रामटेकचा होणारा खासदार राजू पारवे हा असला पाहिजे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
रामटेकचा ‘धनुष्य बाण’ हा रामाचा
रामटेक ही प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. राजू पारवे हे काम करणारे व्यक्तीमत्व आहे. म्हणून रामटेक लोकसभा निवडणूकीत महायुतीने शिवसेनेच्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. मतदान केंद्रात पहिल्याच क्रमांकावर राजू पारवे यांच्या धनुष्य बाण चिन्हाचे बटन आहे, येणाऱ्या 19 एप्रिल 2024 रोजी सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करून पारवे यांना निवडून द्यावे. त्यामुळे ‘धनुष्य बाण हा रामाचा’ असे बोलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वांची मने जिंकली. यावेळी महायुतीच्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहण्यास मिळाला. याप्रसंगी नरखेड आणि सावनेर परिसरातील सर्व समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. तसेच रामटेक लोकसभा निवडणुकीत राजू पारवेंच्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. विविध समाजातील बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.