नागपूर (Nagpur) :- कोलार नदीचे पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) सिव्हरेज ट्रिटमेंट प्लान्ट (एसटीपी) तयार करण्याचे आदेश दिले होते. चिचोली येथील ०.९९ हेक्टर जागेवर ते तयार होणार होते. परंतु दोन वर्षे लोटूनही निधीअभावी ते तयार झाले नाही. या एसटीपीसाठी आता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेतला आहे. नांदेडच्या धर्तीवर ‘डिसेंट्रलाईज्ड वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लान्ट’ उभारण्याचे नियोजन आखण्यात आले.
या प्रकल्पाचा खर्च तब्बल २.५० कोटींच्या घरात अपेक्षित असून, त्यासाठी स्वच्छ भारत मिशन आणि खनिज प्रतिष्ठानमधूनही निधीची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सावनेर तालुक्यातील चिचोली, खापरखेडा व पोटा चनकापूर या ग्रामपंचायती अंतर्गतचे लाखो लिटर घाण व सांडपाणी लगतच्या कोलार नदीत जाऊन मिसळते. यामुळे नदी प्रदूषित होत आहे. या सांडपाण्याला रोखण्यासाठी तेथे एसटीपी निर्माण करून नदीत जाणाऱ्या घाण व सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचे आदेश एनजीटीने दिले होते. हा प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण न केल्यास महिन्याला ५ लाखांचा दंड भरण्याची तयारी ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेला एनजीटीने दिले आहेत. परंतु आज दोन वर्षे लोटूनही या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीचा प्रश्न मार्गी लागला नाही. जि.प.ने या एसटीपीच्या उभारणीसाठी लागणाऱ्या ३.५६ कोटींच्या निधीचा प्रस्ताव एमपीसीबी पाठविल्यानंतरही एमपीसीबीकडून निधीच उपलब्ध झाला नव्हता.
निधीअभावी हा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजीपी) माध्यमातून तयार करण्यात येणार होता. परंतु, एमपीसीबीकडे या प्रकल्पासाठी आवश्यक निधी नसल्याने तो प्रकल्प ‘नीरी’च्या अडीच कोटी खर्चाच्या लो कॉस्टच्या; परंतु चांगल्या दर्जाच्या ‘वेट लॅन्ड टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून उभारण्याचे प्रयत्न झाले. परंतु एमपीसीबीने तेव्हाही निधीसाठी नकार दर्शविला. आता यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षात हा प्रकल्प मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.