जलसाठ्यात वाढ करीत जलप्रदूषण थांबवा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

‘चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत संवाद फेरी व 

नदी पूजन कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर :- ‘चला जाणूया नदीला या अभियानाअंतर्गत जलसाठ्यात वाढ करीत नदी प्रदूषण थांबविण्याची गरज आहे. या अभियानात लोकसहभाग महत्त्वपूर्ण असून प्रशासनास जनतेचे सहकार्य मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येथे केले.

उमरेड उपविभागांतर्गत येणाऱ्या आम नदी काठावरील खैरी आणि मकरधोकडा या गावांमध्ये आज जल प्रदूषणास प्रतिबंध व्हावा व आम नदी पुनर्जीवित व्हावी यासाठी जनजागृती विषयक संवाद फेरी आणि नदीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. इटनकर बोलत होते.

निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपवनसंरक्षक डॉ.भारतसिंह हाडा, सहायक वनसंरक्षक हरवीर सिंग, उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण, तहसीलदार संदीप पुंडेकर, राज्यस्तरीय सदस्य डॉ. प्रवीण महाजन, आम नदी समन्वयक डॉ. विजय घुगे, सदस्य प्रद्युम्न सहस्त्रभोजणी, प्रा.अरविंद कडबे, खैरी ग्रामपंचायतीचे सरपंच विजय धुर्वे, मकरधोकडा येथील सरपंच गिल्लुरकर यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी, अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

‘चला जाणूया नदी’ला या अभियानाचा मुख्य उद्देश हा जलसाठा वाढविणे आणि नदी प्रदूषित होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करीत त्या प्रभावीपणे अंमलात आणणे हा आहे. जलसाठ्यात वाढ व्हावी यासाठी नदी खोलीकरण करण्यात येत आहे. यासोबतच दूषित पाणी नदीपात्रात सोडले जाऊ नये यासाठी प्रत्येक घरासमोर शोषखड्डा करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी वैयक्तिक शोषखड्डे शक्य होणार नाही त्या ठिकाणी सामूहिक शोषखड्डे मनरेगाच्या माध्यमातून करावीत. जेणेकरून जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल. ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

चला जाणूया नदीला या महत्वाकांक्षी अभियानात महाराष्ट्रातील 108 नद्यांचा समावेश आहे. यात जिल्ह्यातील नाग आणि आम या दोन नद्यांचा समावेश आहे. यापैकी प्रामुख्याने उमरेड तालुक्यातील मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रातील साधूखोरा येथून उगम होत असलेल्या तर कुही तालुक्यातील अंभोरा जवळ वैनगंगा नदीत संगम होणाऱ्या आम नदी पुनर्जीवनासाठी या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.      कार्यक्रमानंतर जलसाक्षरता रथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय घुगे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री जिल्हा दौऱ्यावर

Sat Jul 8 , 2023
गडचिरोली :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळी 11.00 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रमास एम.आय.डी.सी. मैदान कोटगुल रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत), गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा (व्ही.सी.द्वारे). त्यानंतर शासन आपल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com