नागपूर :- शहर स्वच्छतेच्या कार्यात मनपाकडे रस्ते स्वच्छतेसाठी उपलब्ध असलेल्या रोड स्विपींग मशीनच्या ताफ्यात आणखी एक अत्याधुनिक रोड स्विपींग मशीन दाखल झालेली आहे. या मशीनचे मंगळवारी (ता.२) मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी लोकार्पण केले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत परिसरात अत्याधुनिक रोड स्विपींग मशीनच्या लोकार्पण प्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, मेकॅनिकल अभियंता गुरनुले, अँटोनी मोटर्सचे संचालक थॉमस एडिसन, प्रोजेक्ट हेड समीर टोणपे आदी उपस्थित होते.
जगातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक असलेल्या बुशर (Bucher) कंपनीची ही मशीन असून मशीनचे संचालन आणि व्यवस्थापन अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लि. द्वारे करण्यात येणार आहे. मशीनची क्षमता ५ क्यूबिक मीटरची असून मशीन एक तासात ७ ते ८ किमी रस्ता स्वच्छ करू शकते. २० क्यूबिक मीटर कचरा सक्शन करण्याची मशीनची क्षमता आहे, अशी माहिती अँटोनी मोटर्सचे संचालक थॉमस एडिसन यांनी दिली.
मशीन दिवसभरात ४० किमी सफाई कार्य करेल. कंपनीकडे मशीनचे संचालन आणि व्यवस्थापन असून मनपाद्वारे प्रति किमीसाठी ११३० रुपये कंपनीला देण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.
नागपूर शहरातील प्रमुख रस्त्यांसह, रिंग रोड, अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये मेकॅनिकल रोड स्विपींग मशीन उपलब्ध झालेली आहे. मनपाकडे यापूर्वी दोन मशीन उपलब्ध असून या ताफ्यात अत्याधुनिक मशीनचा समावेश झाला आहे. रस्त्यासह रस्ता दुभाजक, फुटपाथ आदी सर्व या मशीनद्वारे स्वछ केले जाणार आहेत.