मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघ्या जगाला थक्क व्हायला लागेल, असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मंत्रालयात राज्य वस्तुसंग्रहालय साकारण्यासंदर्भा- तील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, आर्किटेक्ट राहुल गोरे, बतुल राज मेहता, डॉ. कुरूष दलाल, मारिया तालिब यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अनेक राज्यांनी आपली राज्य वस्तुसंग्रहालय निर्माण केली असून आपल्या या संग्रहालयात आपल्या राज्याचा इतिहास, कला आणि संस्कृती दर्शविली आहे. महाराष्ट्रातही राज्य संग्रहालय निर्माण करताना महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक इतिहास आणि प्रगती प्रतिबिंबित करण्यात येईल.
अश्मयुगापासुन ते आधुनिक काळापर्यंत महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली प्रवास दाखवणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यासाठी संचालनालयामार्फत कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात यावी. तसेच देशातील सर्वोत्तम वस्तूसंग्रहालये यांची पाहणी आणि अभ्यास तातडीने करण्यात यावा अशा सूचनाही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. आवश्यकता वाटल्यास आपण सुद्धा बिहार येथील वस्तूसंग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी येथे भेट देणार असल्याचे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
या संकल्पिक वस्तुसंग्रहालयामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्वाचे कालखंड-अश्मयुगीन, प्रागैतिहासिक काळ, ऐतिहासिक व मध्ययुगीन काळ, मराठा व ब्रिटिश कालखंड, महाराष्ट्रातील लोकजीवन व आदिवासी संस्कृती, स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आधुनिक महाराष्ट्रासंबंधी विविध दालने उभारणार असून, यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्य वस्तुसंग्रहालय निर्माण करताना सल्लागार समिती स्थापना करण्यात आली आहे. या सदर समितीमध्ये पुरातत्त्वशास्त्र, वस्तुसंग्रहालय शास्त्र, इतिहास, संस्कृती, कला, विज्ञान, प्रशासन, वास्तु व स्थापत्यशास्त्र, इ. विषयातील १८ तज्ज्ञ संदस्यांचा समावेश आहे.