नागपूर : राज्यस्तरीय शालेय हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ आज सकाळी दादोजी कोंडदेव पुरस्कारार्थी सिताराम भोतमांगे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक, शेखर पाटील, जिल्हा हॅन्डबॉल संघटनेचे डॉ. सुनिल भोतमांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ऑलम्पिक कास्य पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्पर्धा कीतीही मोठी असली तरी आपण न डगमगता निकराने सामना केला पाहीजे, निश्चित मार्ग सापडतो पण तो मार्ग शोधण्यासाठी अभ्यास मार्ग मिळेपर्यंतचा ध्यास आणि मी जिंकेनच हा आत्मविश्वास या तीनही गोष्टी अंगी असल्या पाहीजे, असे मत व्यक्त करून सर्व खेळाडूंना या स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय तथा हॅन्डबॉल संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे 23 ते 24 जानेवारीदरम्यान सुरु असलेल्या 17 व 19 वर्ष वयोगटातील मुलांमुलीच्या राज्यस्तरीय शालेय हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर व क्रीडा प्रबोधिनी असे एकूण 9 विभागातील जवळपास 600 खेळाडू सहभागी झाले आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक तर सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी अभय महल्ले यांनी केले.
आजच्या सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या स्पर्धेचा निकाल याप्रमाणे आहे. 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत नागपूर विरुद्ध लातूर यांच्यात सामना झाला. यात नागपूर संघ विजयी तर अमरावती विरुद्ध औरंगाबाद सामान्यात औरंगाबाद संघ विजयी ठरला. 19 वर्ष वयोगटातील मुलीच्या स्पर्धेत नागपूर विरुद्ध मुंबई सामन्यात नागपूर संघ विजयी तर पुणे विरुद्ध नाशिक सामन्यात पुणे संघ विजयी ठरला. 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या नाशिक विरुद्ध औरंगाबाद सामन्यात नाशिक विजयी तर कोल्हापूर विरुध्द मुंबई सामन्यात कोल्हापूर संघ विजयी ठरला.