भविष्यातील ‘हिमा दास’ तयार होण्यासाठी खेळाडूंच्या मागे भक्कमपणे उभे रहा : ना. नितीन गडकरी

– हिमा दास यांच्या हस्ते क्रीडा संघटनांना ध्वज वितरीत

– १२ ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान खासदार क्रीडा महोत्सव रणसंग्राम

– ५५ खेळ, ६६ क्रीडांगण, ६५ हजार खेळाडू, १ कोटी ३५ लाखांचे पुरस्कार

नागपूर :- नागपूर शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने खासदार क्रीडा महोत्सवाची सुरूवात करण्यात आलेली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी अधिक जोमाने आपल्या खेळात पारंगत होऊन यश संपादित करावे या हेतून त्यांच्या प्रोत्साहनासाठी विविध आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आमंत्रित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविणाऱ्या हिमा दास एका दिवसात तयार झालेल्या नसून त्यामागे सातत्य आणि शिस्त आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून भविष्यात असे अनेक ‘हिमा दास’ नागपूर शहरातून तयार व्हावेत यासाठी मैदानावर जाऊन खेळाचा आनंद घ्या, खेळाडूंना प्रोत्साहन द्या, खेळाडूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रीडा संघटना, प्रशिक्षक, पालक आणि नागरिकांना केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत व आंतरराष्ट्रीय अॅथलिट हिमा दास यांच्या शुभहस्ते रविवारी (ता. १७ डिसेंबर) सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा आणि क्रीडा संघटनांना ध्वज वितरण करण्यात आले. कस्तुरचंद पार्क जवळील किंगस्वे हॉस्पिटल इमारतीतील भाई बर्धन स्मृती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, भाजपा महाराष्ट्र क्रीडा सेलचे अध्यक्ष संदीप भोंडवे, राणी द्विवेदी, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कोषाध्यक्ष आशीष मुकीम, सुधीर दिवे, नागेश सहारे, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, डॉ. सौरभ मोहोड, रमेश भंडारी, प्रकाश चांद्रायण, नवनीतसिंग तुली आदी उपास्थित होते.

१२ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. आंतरराष्ट्रीय अॅथलिट हिमा दास यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी विविध ५५ खेळांच्या क्रीडा संघटनांना महोत्सवाचा ध्वज प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित स्पर्धांमध्ये खेळणारा नागपूरकर आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे याने आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन गोल्ड मेडल पटकावून जगात नागपूर शहराचे नाव उंचावल्याचे अभिमानो सांगितले. त्यांनी असे अनेक खेळाडू शहरातून निर्माण व्हावेव व त्यांनी विविध खेळांच्या माध्यमातून नागपूर शहराचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे, असे देखील आवाहन केले. खासदार क्रीडा महोत्सवात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांसाठी देखील स्पर्धांचे आयोजन ही अत्यंत आनंदाची बाब आहे. खेळाडच्या माध्यमातून खेळाडूंच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याचेही ना. गडकरी म्हणाले. विदर्भातील जास्तीत जास्त खेळाडूंना खासदार क्रीडा महोत्सवात सहभागी होता यावे यासाठी पुढील काळात जास्तीत जास्त विदर्भ स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाबाबत विचार करण्याचे त्यांनी खासदार क्रीडा महोत्सव समितीला सूचित केले. क्रीडा संघटनांनी देखील खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी सर्वांनी एक होऊन कार्य करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शिस्त आणि सातत्याचा अंमल करा : हिमा दास

२०१७ साली अॅथलेटिक्सची सुरूवात केली आणि २०१८ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप पटकावले. हे यश अनेकांना सहज आणि सोपे वाटते मात्र यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. घर, आई-वडील यांच्यापासून दूर रहावे लागले, आवडते अन्न देखील सोडावे लागले आणि पूर्णवेळ सातत्याने अॅथलेटिक्ससाठी समर्पित करावे लागले. या सर्व समर्पन आणि त्यागातून आत वर्ल्ड अॅथलिट म्हणून बिरूद लागले आहे. आसामामधील अतिशय लहान खेडेगावातून येऊन मी हे सर्व करू शकते तर आपण का नाही? असा प्रश्न करीत ‘धिंग एक्सप्रेस ऑफ इंडिया’, ‘गोल्डन गर्ल ऑफ आसाम’ हिमा दास यांनी खेळाडूंना प्रोत्साहित केले. त्यांनी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सुरू केलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे कौतुक करताना खेळाडू म्हणून ना. गडकरी यांचे आभारही मानले. २०१८ मध्ये खासदार क्रीडा महोत्सवाची सुरूवात झाली आणि त्याच वर्षी त्या ‘वर्ल्ड चॅम्पियन’ झाल्याचे साम्य देखील त्यांनी जोडले. प्रत्येक खेळाडूला पाया मजबूत करण्यासाठी स्थानिक स्तरावर स्पर्धांची गरज असते. ती खासदार क्रीडा महोत्सव नागपुरातील खेळाडूंसाठी पूर्ण करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. नागपुरातील खासदार क्रीडा महोत्सवाप्रमाणे देशभर क्रीडा महोत्सव घेतले जावेत यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. पालकांनी मुलांना खेळासाठी पुढे आणल्याबद्दल पालकांचे आभार मानत हिमा दास यांनी खेळाडूंनी त्यांना मिळणारे मार्गदर्शन प्रोत्साहन हे केवळ ऐकण्यापूरते न ठेवता अंमलात आणण्यास सांगितले. खासदार क्रीडा महोत्सवामुळे पुढील काळात नागपुरातील अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारे खेळाड तयार होतील, असा विश्वास यावेळी आंतरराष्ट्रीय अॅथलिट हिमा दास यांनी व्यक्त केला.

यंदाही खेळाडूंना विमा कवच : संदीप जोशी

खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी खेळाडूंना मागील वर्षा प्रमाणे यावर्षी देखील विमा सुविधा मिळणार असल्याचे खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या वॉकथॉनमध्ये दुर्दैवाने एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या कुटूंबियांना या विम्याचा लाभ मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाबाबत सांगताना ते म्हणाले, यंदाचा क्रीडा महोत्सव १२ ते २८ जानेवारी २०२४ असा १७ दिवस चालणार असून या १७ दिवसांमध्ये शहरातील ६६ क्रीडांगणांवर ५५ खेळ खेळले जातील. यात विविध ५५ खेळांच्या १०५० चमू, ४८०० ऑफिसियल्स, ६५ हजार खेळाडूंचा समावेश असेल. एकूण १२५०० स्पर्धा खेळविण्यात येणार असून यात खेळाडूंना ८९८० मेडल्स आणि ७३५ ट्रॉफी देण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ३५ लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षी विदर्भ स्तरावर बास्केटबॉल, कबड्डी, कुस्ती, अॅथलेटिक्स आणि खो-खो या पाच खेळांचा समावेश असल्याचेही संदीप जोशी यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन माय एफएम चे आरजे आमोद यांनी केले. डॉ. पीयूष आंबुलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अशफाक शेख यांनी श्री गणेशाच्या गीताचे उत्कृष्ट सादरीकरण केले. धनंजय यांनी सॅक्सोफोनवर उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रकाश पोहरे ने विधानसभा गैलरी में दी विदर्भ की घोषणा 

Mon Dec 18 , 2023
– विदर्भ की समस्या पर आवाज न उठाने से हुए संतप्त  नागपुर :- पिछले 7 दिसंबर से नागपुर में शीतकालीन सत्र चल रहा है. लेकिन छह दिनों की अवधि में विदर्भ की समस्याओं पर चर्चा नहीं हुई. इससे देशोन्नति के प्रधान संपादक विदर्भ नेता लोकनायक प्रकाश पोहरे ने गुरुवार शाम को विधानसभा की कार्यवाही चलने के दौरान प्रेस गैलरी में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com