– मनपा आणि रोटरी क्लब नागपूर ईशान्यचा संयुक्त उपक्रम : ११२५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नयेत, त्यांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी व त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जावी या हेतूने मनपाद्वारे महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आलेला आहे. रोटरी क्लब नागपूर ईशान्य यांच्या सहकार्याने मनपाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’ उपक्रमांतर्गत बुधवारी (२७ डिसेंबर) मनपाच्या डिप्टी सिग्नल येथील संजय नगर हिंदी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संजय नगर हिंदी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सुमारे ११२५ विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, मनपा शिक्षण विभागाचे प्रशांत टेंभुर्णे, माजी नगरसेविका चेतना टांक आदी उपस्थित होते.
या उपक्रमाला इंडियन डेंटल असोसिएशन, नागपूर, न्यू एरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल, नागपूर, आणि अरिहंत हॉस्पिटल, नागपूर यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे सहकार्य मिळत आहे. नागपूर शहरातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’ उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. या संकल्पनेला नागपूर महानगरपालिकेद्वारे उत्तम साथ मिळाली असून मनपाच्या सहकार्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधा प्रदान करण्यात येईल, असा विश्वास रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यचे अध्यक्ष शरद टावरी यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यचे सदस्य ऋषभ शाह, परेश पटेल, दीपा अग्रवाल, प्रिती अग्रवाल, गोपाल केयाल, अंकित पसारी, नेहा पसारी, डॉ.दीपशिखा लष्करे, डॉ.केतन गर्ग, कविता टावरी यांचे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य मिळत आहे.