स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : मनपा मुख्यालय ते नगर भवनपर्यंत रॅली
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातून शुक्रवारी (ता.१२) तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीला नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
शुक्रवारी (ता.१२) सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत परिसरातून रॅलीला सुरूवात झाली व महाल येथील रघुजी राजे भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे रॅलीचे समापन झाले. रॅलीत महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच उपद्रव शोध पथकाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दुचाकी चालवित रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी मनपातील महिला कर्मचा-यांनी आयुक्तांसह अधिका-यांचे औंक्षण करून स्वागत केले. अग्निशमन विभागाच्या पथकाने बाईक रॅलीचे नेतृत्व केले. बाईक रॅलीमध्ये नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलमपेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता प्रदीप खवसे, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त महेश धामेचा, सहायक आयुक्त अशोक पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, तेजेंदिर सिंह रेणु, प्रशून चक्रवर्ती तसेच मनपाचे कर्मचारी आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
या प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, नागपूर मनपातर्फे आजादीचा अमृत महोत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जात आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानात सर्वांनी आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा लावावयाचा आहे. नागरिकांनी या अभियानात उत्साहाने सामिल होण्याचे आवाहन ही त्यांनी केले.
मनपा मुख्यालयातून सुरू झालेली बाईक रॅली, लिबर्टी टॉकीज चौक, छावणी चौक, बैरामजी टाऊन, पागलखाना चौक, पोलीस तलावापासून डावीकडे, जुना काटोल नाका चौक, जापनीज गार्डन चौक, लेडिज क्लब चौक, जी.एस. कॉलेज चौक, शंकरनगर चौक, झाशी राणी चौक, लोहापूल नवीन अंडर पास पासून उजवीकडे, मोक्षधाम चौक, अशोक चौक, रेशीमबाग चौक, जगनाडे चौकातून डावीकडे, गंगाबाई घाट चौकातून डावीकडे, नटराज टॉकीज चौक या मार्गे मनपा नगर भव्न, महाल (टाऊन हॉल) येथे पोहोचली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.