नागपूर :- एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यशाच्या दिशेने भरारी घेतली. या सर्वांमध्ये एका विद्यार्थ्याचे यश अधोरेखित होत आहे. नागपुरातील मासोळी विक्रेत्याच्या मुलाने तब्बल 98.49 टक्के गुण प्राप्त करून आपल्या नेत्रदिपक यशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दिनेश प्रल्हाद नायक असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो क्रिष्णा टॉकीज जवळ, संत्रा मार्केट येथील रहिवासी आहे. दिनेशचे वडिल प्रल्हाद नायक हे मासोळी विक्रीचा व्यवसाय करतात तर आई रेखा या गृहिणी आहेत. दिनेशने न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज महाल येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले.
दिनेश नायक याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (Physics, Chemistry, Biology) या ग्रुपसह एमएचटी-सीईटी परीक्षा दिली. त्याने रसायनशास्त्र विषयात 99.59 टक्के, भौतिकशास्त्र विषयात 97.23 टक्के आणि जीवशास्त्र विषयात 94.71 टक्के गुण मिळविले. त्याच्या संपूर्ण गुणांची टक्केवारी 98.49 टक्के एवढी आहे. बारावीमध्ये दिनेशने 76.16 टक्के गुण प्राप्त केले.
त्याने यशाचे श्रेय आई-वडील आणि न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज महाल येथील शिक्षकांना दिले आहे.