महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावी – राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम वेंकटेशन  

मुंबई :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून सफाई कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम वेंकटेशन यांनी दिले आहेत. राज्यात सामाजिक न्याय विभागाने सफाई कामगारांना प्लास्टिक क्रेडिट चा लाभ मिळण्यासाठी हिंदुस्तान ऍग्रो या कंपनीच्यावतीने अभिनव संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे.

राज्यातील सफाई कामगार यांचे विविध प्रश्न व अडचणींबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेशन व सदस्य पी.पी.वावा यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी निर्देश दिले.

राज्य शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपावरील वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या महाप्रित कंपनीच्या योजना, ‘नमस्ते’ मोहिम, त्याचबरोबर हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामग्री, साधनसामग्री पुरवणे याबाबत आढावा घेण्यात आला.

तज्ञांच्या सल्ल्याने प्लास्टिक क्रेडिटचे फायदे हे सफाई कर्मचारी यांच्यापर्यंत पोहचविण्याबाबत चर्चा झाली. प्लास्टिक क्रेडिट, कार्बन क्रेडिट आणि इतर प्रकारचे क्रेडिट अशा संकल्पना आहेत, ज्यामुळे प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच पर्यावरणालाही फायदा होणार आहे. सफाई कामगारांनी जमा केलेल्या या प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यातून आर्थिक उत्पन देखील मिळणार आहे. या योजनेचे सादरीकरण हिंदुस्तान ऍग्रो चे डॉ. भरत ढोकणे-पाटील यांनी यावेळी केले.

याप्रसंगी बृहन्मुंबई मनपा चे आयुक्त आय एस चहल, बेस्ट चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मुंबईत सफाई कामगारांकरिता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयोगास दिली. राज्यात आज अखेर हाताने मैला साफ करणाऱ्या व दुर्दैवाने मृत्यू झालेल्या 73 कामगारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई वारसांना राज्य शासनाच्यावतीने देण्यात आल्याची माहिती यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून यावेळी विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले.

बैठकीस राज्य शासनाच्या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दिनेश डिंगळे, सह सचिव सो.ना.बागुल, उपसचिव रवींद्र गोरवे, हिंदुस्तान ऍग्रो चे कन्सल्टंट गौरव सोमवंशी, अनिल चोप्रा, समाज कल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, लंडनच्या ‘सिर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब’चे संचालक जोएल मायकल, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अधिकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, राज्यातील सफाई कामगारांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लर्निंग 2.0 या अभिनव उपक्रमाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

Sun Jul 16 , 2023
मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने रिड मुंबई, ग्रीन स्कुल-टेरेस फार्मिंग, विद्यार्थ्यांचे डिजिटल /रोबोटीक स्किलिंग,द स्मायलिंग स्कुल प्रोजेक्ट, समावेशक शिक्षण व बीएमसी डॅशबोर्डचा समावेश असलेल्या लर्निंग 2.0 या अभिनव उपक्रमाचे उदघाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. वुलन मिल, मनपा एमपीएस शाळा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com