उपसा सिंचन योजनांच्या कार्यक्षमता वाढीसाठी ‘एसओपी’ तयार करावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

– लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत

मुंबई :- गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या उपसा सिंचन योजना अधिक कार्यक्षमतेने सुरू राहाव्यात यासाठी या योजनांचे पुन्हा सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. या योजनांच्या कार्यक्षमता वाढीच्या अनुषंगाने एसओपी तयार करावी, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील विविध विषयाबाबत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने मंत्रालयातील समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, अब्दुल सत्तार, अभिजीत पाटील, विनय कोरे, अशोकराव माने, राहुल कुल, संभाजीराव पाटील निलंगेकर, सुरेश धस, राणा जगजितसिंह, अभिमन्यू पवार, विजयसिंह पंडित, आशुतोष काळे उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, सन्माननीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघात मागणी केलेली कामे ही लोकहिताची असतात. या कामांच्या मंजुरीमुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा व जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याने ही कामे कालबध्द रीतीने पूर्ण झाली पाहिजेत. ज्या योजनांच्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे त्याचा प्रस्ताव सादर करावा. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे, दुरुस्ती करणे या कामात तज्ञांचे मत घ्यावे. पूर संरक्षक भिंत बांधणे बाबत सर्व्हे करावा. राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने अनेक योजना मंजूर केल्या आहेत. या योजनांची कामे गतीने व दर्जेदार व्हावीत. ही कामे जलद गतीने होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना श्री. विखे-पाटील यांनी दिल्या. योजनांसाठी आवश्यक भूसंपादन कालमर्यादेत होणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

बैठकीस अपर मुख्य सचिव दिपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरामणवार, जलसंपदा सह सचिव संजीव टाटू, अभय पाठक, उपसचिव प्रवीण कोल्हे यांच्यासह कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ योजनेची महाविद्यालयांमधून प्रभावीपणे अंमलबजावणी करा - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Thu Feb 13 , 2025
– मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट सांमजस्य करार मुंबई :- “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आण नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले राज्यातील विविध शासकीय विद्यापिठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!