सोनिया गांधी यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी..! – लीलाताई चितळे  

 सोनिया गांधी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘महिला सक्षमीकरण दिवस’ साजरा करण्यात आला.

रणजीतबाबू देशमुख, डॉ. आशिष र. देशमुख व इतर मान्यवरांची उपस्थिती.

 सोनिया गांधी अमृत महोत्सव समारोह आयोजन समिती, नागपूरचा उपक्रम.

नागपूर :- “आजच्या तरुणाईवर माझा विश्वास आहे. देशाचा कॉंग्रेस पक्ष हा १८८२ मध्ये जन्माला आलेला पक्ष आहे. ३-४ पिढ्यांपासून हा पक्ष ताठ उभा आहे. देशात कॉंग्रेस पक्षाइतका दुसरा समतोल राजकीय पक्ष निर्माण झालेला नाही. तिरंग्याच्या खाली, कॉंग्रेसच्या हस्ते, आपण स्वातंत्र्य मिळविले आहे. आमच्या इतिहासात कोणतेही धार्मिक तत्व नाही. पण आम्ही धर्माचा निश्चितच सन्मान करतो. त्याकाळी आम्ही हिंदू धर्माकरिता भांडलो नाही. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या गोष्टी एका सिद्धांतावर होत्या आणि तो सिद्धांत मानवतेवर व स्वच्छ विचारांवर आधारलेला होता, थैल्यांवर आधारलेला नव्हता. देशातील आजची देशाची परिस्थिती राज्यघटनेला अनुकूल परिस्थिती नाही. एक नागरिक म्हणून मला शासनाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आहे. माझ्या वैयक्तिक जीवनात शासनाची लुडबुड चालणार नाही. वंदे मातरम म्हटले की, आम्हाला इंग्रजांकडून तुरुंगवास व्हायचा. स्वातंत्र्याच्या काळात आजच्या भाजपावाल्यांचा आणि त्यांच्या जन्मदात्यांचा जन्म झालेला नव्हता. कॉंग्रेस जेव्हा लढते तेव्हा सिद्धांताने लढते, सत्तेसाठी लढत नाही. परदेशी आहे, अशी सोनियांवर टीका करणारे आहेत. परंतु, सोनियांचे ऋण या देशावर आहे. आजचा दिवस हा सोनियाचा दिवस आहे, त्यांना १२५ वर्षे आयुष्य मिळो, अशी मी भगवंताजवळ प्रार्थना करते. ज्या नेत्यांना आज पुढे आणल्या जात आहे, त्यांच्या मागे सोनियांची शक्ती आहे. मनापासून आपण सर्व त्यांच्या सोबत आहोत. सोनिया गांधी यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी आहे”, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधी विचारवंत लीलाताई चितळे यांनी केले. सोनिया गांधी अमृत महोत्सव समारोह आयोजन समिती नागपूरतर्फे कॉंग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांचा अमृत महोत्सव ९ डिसेंबर २०२२ ला ‘महिला सक्षमीकरण दिवस’ म्हणून हॉटेल हेरिटेज, व्ही.सी.ए. ग्राऊंडजवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लीलाताई चितळे व्यासपीठावरून बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रणजीत देशमुख (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांनी भूषविले. कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख आणि माजी आमदार डॉ. गिरीश गांधी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. गिरीश गांधी यांनी म्हटले की, “कॉंग्रेस पक्ष वाढविण्याची जबाबदारी युवकांवर आहे. आपसातले वाद-विवाद, भांडणे बंद करावीत. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेतून परिवर्तनाची जी लाट निर्माण केली त्या लाटेला मतांमध्ये परिवर्तीत करण्याची गरज आहे आणि त्यासाठी सर्व कॉंग्रेस कार्यकर्ते एकजूट झाले तरच सोनिया गांधी यांच्या त्यागाला यश मिळेल.”

डॉ. आशिष र. देशमुख यांनी  सोनिया गांधी यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “देशाचे भवितव्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पक्षासाठी मनावर दगड ठेवून आपण राजकारणात सक्रीय झालात…आणि इतिहास रचलात. दोन आघातांचे आभाळ कोसळल्यानंतरही आपण स्वत:ला सांभाळले. न डगमगता कुटुंब व देशाला दिशा देण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. विरोधकांकडून अनेकवेळा हिणवले गेले व आजही तसे प्रयत्न होत आहेत. पण आपण खचल्या नाही. देशावर अनेक आपत्ती आल्या, नैसर्गिक संकटे आली, राजकीय षडयंत्र रचले गेले तरी, आपण कणखरपणे संघटन व सरकारमध्ये समन्वय साधून देश स्थिर करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, पक्षात फुटीनंतर आपण तितक्याच खंबीरपण उभ्या राहिल्या. देशातील काही नेत्यांच्या तुलनेत आपला राजकीय प्रवास भलेही कमी असेल पण, आपले कार्य, कर्तृत्व आणि कामगिरी अतुलनीय राहिली. यापूर्वी आणि आजही सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाण्याची वृत्ती सर्वत्र दिसत असताना देशाच्या सिंहासनाचा केलेला त्याग आधुनिक जगात एकमेवाद्वितीय असावा. आपण एकाच वेळी विविध भूमिका पार पाडल्या. यात आपण कुठेही तडजोड गेली नाही. आधी पत्नी, सून, आई आणि नंतर सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्ष, असा आपला प्रवास राहिला. देशातील प्रमुख राजकीय पक्ष व विविध राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे प्रमुख, अशा विविध जबाबदाऱ्याही आपण यशस्वीपणे सांभाळल्या. विदर्भाने पक्षाला दिलेली भरभरून साथ, वैदर्भीय भूमीच्या पावन स्पर्शाने लाभलेले यश हे आपण सुरुवातीलाच ओळखले होते. सक्रिय राजकारणात प्रवेश करताच विदर्भाच्या पावन भूमीला आपण केलेल्या नमनावरून हे अधोरेखित होते. देशाच्या उपराजधानीतून १४ एप्रिल २००० साली संविधान बचाव रॅलीद्वारे आपण देशवासियांना साद घातली. त्याला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २००४ साली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचीच सत्ता येईल, असा आभास निर्माण गेला तरी, प्रत्यक्षात आपल्या नेतृत्वाखाली काँग्रेस व मित्रपक्षांना यश मिळाले होते. आपल्या खंबीर नेतृत्वाखाली सलग दोन वेळा पक्षाने सरकार स्थापन केले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी आपण व्यथित झाल्या. केंद्र सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी दौरा केला. शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर देशभरातील तमाम शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा झाली. शिक्षणाच्या अधिकाराने कोट्यवधी गरीब मुलांना आणि अन्न सुरक्षेने कोट्यवधी कुटुंबीयांना भोजन उपलब्ध झाले. माहितीच्या अधिकाराने सर्वसामान्यांना न्याय मिळाला. असे धाडसी निर्णय फक्त काँग्रेस आणि आपणच घेऊ शकता, हे परत एकदा सिद्ध झाले. पूर्व विदर्भाला सुजलाम, सुफलाम करण्याची क्षमता असणाऱ्या गोसेखुर्दला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा आपल्यामुळेच मिळाला. २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवनी येथील सभेत गोसेखुर्द पूर्ण करण्याचे राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण करणार, असे आश्वासन आपण दिले होते. आणि गोसेखुर्दला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊनच हे आश्वासन पूर्ण केले, ही बाब वैदर्भी लोक कधीही विसरणार नाहीत. आपला स्वभाव शांत, संयमी असला तरीही, कणखर नेतृत्व व तात्काळ निर्णय घेण्याचे कसब आपल्यात आहे. त्यामुळे पक्षांतर्गत असंख्य गट असतानाही केवळ आपल्या नेतृत्वामुळे पक्ष एकसंध राहिला व आजही आपणच नेतृत्व करावे, अशी भावना देशाच्या कानाकोपऱ्यातील जनसामान्यांची आहे. आपल्या संघर्षशील नेतृत्व शैलीने अनेकांना प्रेरणा दिली. आपला अमृत महोत्सव साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपला जन्मदिन आम्ही महिला सक्षमीकरण दिन म्हणून साजरा करीत आहोत, याचा अभिमान आहे. आपणास निरोगी, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

रणजीत देशमुख यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत केलेल्या राजकीय कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या निमित्याने साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व माजी आमदार डॉ. गिरीश गांधी, स्त्री-अत्याचार विरोधी कार्यकर्त्या डॉ. सिमा साखरे, स्वांतत्र्य संग्राम सैनिक यादवराव देवगडे, गांधी विचारवंत मा.मा. गडकरी, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त (द्रोणाचार्य) बिमल घोष व महाराष्ट्र राज्य साहित्य वाड.मय पुरस्कार २०२२ पुरस्कृत आबिद शेख, यवतमाळ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सोनिया गांधी यांच्या अमृत महोत्सवानिमित्य यावेळी केक कापण्यात आला. माजी आमदार अशोक धवड, सचिव अखिल भारतीय कॉग्रेस कमिटी नितीन कुंभलकर, माजी आमदार एस. क्यू. जमा, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रफुल्ल गुडधे, अॅड. आसिफ कुरेशी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी आपले मत यावेळी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हायकोर्टाचा दणका; 'त्या' ११ ठेकेदारांना ४ आठवड्यांचा अल्टिमेटम

Tue Dec 13 , 2022
नागपूर (Nagpur) : नागपूर-भुसावळ महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ११ कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. तसेच, ४ आठवड्यांमध्ये उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे. ॲड. अरुण पाटील यांनी दाखल केलेली ही जनहित याचिका प्रलंबित असून यात विदर्भातील महामार्गांच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!