यवतमाळ :- आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे सामाजिक न्याय सप्ताहाचे दि. 26 जून ते 2 जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहामध्ये 11 वी व 12 विज्ञान शाखा, तांत्रिक शिक्षणाकरीता प्रवेश घेतलेले विद्यार्थी, निवडणूक व सेवा प्रयोजनार्थ प्राप्त प्रकरणे, सन 2024-25 मध्ये सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्रृटी पूर्तता कॅम्पचे आयोजन दि.26 जून व सुनावणी दि.27 जुलै रोजी घेण्यात आली होती.
सप्ताहानिमित्त आयोजित विशेष शिबिरामध्ये शैक्षणिक, निवडणूक व सेवा या प्रयोजनार्थ एकुण 191 प्रकरणे प्राप्त झालेली होती. त्यापैकी 94 प्रकरणे वैध ठरविण्यात आली व 26 जून रोजी सामाजिक न्याय दिवशी उपायुक्त प्राजक्ता इंगळे, संशोधन अधिकारी मंगला मुन, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्याहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच अर्जदारांना त्रुटी पुर्ततेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाकरीता ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, अशा विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा निवडश्रेणी अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपायुक्त तथा सदस्य प्राजक्ता इंगळे तसेच संशोधन अधिकारी मंगला मुन यांनी आवाहन केले आहे. सामाजिक न्याय सप्ताहाला अर्जदार व जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असल्याचे जात पडताळणी समितीने कळविले आहे.