पर्यटन विकासातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

· सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटीची मान्यता

· श्री क्षेत्र महाबळेश्वर, ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याचे पर्यटनाच्या दृष्टीने जतन करणार

· मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्टस सुरू करणार

मुंबई :- सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांच्या एकात्मिक विकासाकरिता पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यासाठी सुमारे ३८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास व कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटनाचा समावेश आहे.

मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्टस सुरू करण्यात येणार असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस् असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार असून त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

हा संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न असून पर्यटनवृद्धीसाठी मोठी संधी आहे. याठिकाणी निसर्ग पर्यटन, दुर्गभ्रमंती, धार्मिक पर्यटनाबरोबरच वॉटर स्पोर्टस् देखील करता येणार असल्याने या आराखड्याची अंमलबजावणी जलदगतीने करावी. असे निर्देश देतानाच पर्यटन विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या कामांमुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुनावळे येथे नदीत जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्टस् सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ आणि एमटीडीसी यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. याठिकाणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस् चे विविध प्रकार, बोटींग करता येणार आहे. त्यामुळे परिसरात पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी पर्यटन महोत्सव आयोजित करावा, संकेतस्थळ विकसित करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास आराखड्यामध्ये प्रेक्षागृह, तंबू निवास, सफारी मार्गाचे बळकटीकरण, पर्यटन सफारीकरिता वाहने, आदी विविध कामे करण्यात येणार आहे. प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन अंतर्गत किल्ला जतन, दुरूस्तीचे कामे, संग्रहालय निर्मिती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, विद्युतीकरण, सीसीटिव्ही यंत्रणा आदी कामांचा समावेश आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यामध्ये मंदिर व परिसर विकास, वाहन तळ, बाजारपेठ विकास कामे, अन्नछत्र, मंदिर परिसरातील प्राथमिक शाळा, आदी विविध विकास कामांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगासाठीचे पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या कामास गती द्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Fri Feb 23 , 2024
– दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक मुंबई :- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र उभे राहावे यासाठी गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. बैठकीस दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com