– मनपाच्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२३-२४’ अंतर्गत मनपा, यंग कलाम डिस्कव्हरी सायन्स सेंटर नागपूर यांच्या वतीने व एचसीएल फाऊंडेशन आणि एसईडीटीच्या सहकार्याने आयोजित विज्ञान आणि चित्रकला, हस्तकला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रदर्शनात ब्रिज अलर्ट सिस्टीम या मॉडेलला प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
मनपा शाळांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कलागुणांना वाव देणा-या ‘शिक्षणोत्सव २०२३-२४’चे गणेशपेठ येथील अध्यापक भवन येथे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षणोत्सवाचे उद्घाटन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी साधना सयाम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, आकांक्षा फाउंडेशनच्या जयश्री ओबेरॉय, मनपाचे सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, राजेंद्र सुके, नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाचे सचिव देवराव मांडवकर आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेलचे अवलोकन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी मॉडलची माहिती जाणून घेतली. यात विशेषतः सूर्यग्रहण, चंद्रग्रहण दर्शविणारे मॉडेल, स्मार्ट सिटी मॉडेल, पाणी शुद्धीकरण मॉडेल, चांद्रयान, आहार श्रुंखला, पवन चक्की आदी मॉडेल आकर्षक दर्शविण्यात आले. याशिवाय हस्तकाला प्रदर्शनात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती वर भर देण्यात आल्याचे दिसून आले. यात विद्यार्थांनी इको ब्रिक्स द्वारे दैनंदिन वापरत येणाऱ्या वस्तू तयार करून दर्शविल्या. तर चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वच्छता आणि नाविन्यपूर्ण व कल्पनेतील नागपूर शहर दर्शविण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांसाठी गणित, विज्ञान आणि भाषा प्रदर्शनाचे शिक्षणोत्सवात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गणित प्रदर्शनात एकूण ७ शाळांनी सहभाग नोंदविला. यात संजयनगर हायस्कूलच्या भूवन शाहू या विद्यार्थ्याच्या मॉडेलने पहिला क्रमांक पटकाविला. विज्ञान प्रदर्शनीत एकूण ४१ शाळांनी सहभाग नोंदविला. यामध्ये लाल बहादूर शास्त्री हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ब्रिज अलर्ट सिस्टीम’ने प्रथम क्रमांक प्राप्त केला. शाळेचा विद्यार्थी प्रितम कुमारने त्याच्या मॉडेलचे उत्कृष्ट सादरीकरण केले. वाल्मिकीनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ऑइल सेप्रेटर’ या मॉडेलने दुसरा क्रमांक प्राप्त केला. पुरब रहांगडाले आणि युवराज सोनी या विद्यार्थ्यांनी मॉडेलचे नेतृत्व केले. जी.एम.बनातवाला शाळेच्या ‘हेल्थ अँड क्लिनलीनेस’ मॉडेलने तिसरे स्थान पटकावले. अक्षा आणि नाझ या विद्यार्थिनींनी मॉडेलची माहिती सादर केली.
प्रदर्शनात भाषेचे देखील मॉडेल सादर करण्यात आले. जी.एम. बनातवाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी हिंदी व्याकराणातील विकारी शब्दांच्या प्रकाराचे मॉडेल सादर केले. भाषेमध्ये मराठी माध्यमात सुरेंद्रगढ हिंदी माध्यमिक शाळेला प्रोत्साहन बक्षीस प्रदान करण्यात आले. हस्तकला प्रदर्शनी ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात पार पडली. यात ‘अ’ गटात दुर्गानगर मराठी उच्च प्राथमिक शाळेने पहिले तर दुर्गानगर हिंदी प्राथमिक शाळेने दुसरे स्थान प्राप्त केले. ‘ब’ गटात पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेने प्रथम व संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. निलीमा अढाव व पुष्पलता गावंडे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
*निकाल:* विज्ञान प्रदर्शन*
गणित: प्रथम – भूवन शाहू (संजयनगर हिंदी हायस्कूल).
विज्ञान: प्रथम – ब्रिज अलर्ट सिस्टीम (प्रितम कुमार – लाल बहादूर शास्त्री हायस्कूल), द्वितीय – ऑइल सेप्रेटर (पुरब रहांगडाले व युवराज सोनी – वाल्मिकीनगर हायस्कूल), तृतीय – हेल्थ अँड क्लिनलीनेस (अक्षा व नाझ – जी.एम. बनातवाला हायस्कूल)
भाषा:‘विकारी शब्दों के भेद’ (जी.एम. बनातवाला हायस्कूल), प्रोत्साहनपर बक्षीस (मराठी) – सुरेंद्रगढ हिंदी माध्यमिक शाळा
*हस्तकला:*
‘अ’ गट – दुर्गानगर मराठी उच्च प्राथमिक शाळा (प्रथम), दुर्गानगर हिंदी प्राथमिक शाळा (द्वितीय)
‘ब’ गट – पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळा (प्रथम), संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा (द्वितीय)