मुंबई : भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत एक अज्ञात इसम अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती. त्यावेळी वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून एकाला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले, ‘आशिष शेलार सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात. सरकारचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणत आहेत. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल. त्यामुळे पोलिसांनी ही धमकी गंभीरपणे घेतली पाहिजे’
‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेकडून नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची टेहळणी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ही अतिशय गंभीर बाब आहे. याची माहिती आता पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालेली आहे. या संदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा घेतील आणि या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, केंद्रीय तपास संस्थांकडून माहिती मिळाल्यावर पोलिसांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर, आणि इतर काही संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. प्राप्त माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील एक तरुण जुलै महिन्यात नागपुरात आला होता. त्याचा येथे मुक्काम होता. या दरम्यान त्याने शहरातील संवेदनशील ठिकाणांची टेहळणी केली. संबंधित तरुणाला जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली.