संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :- इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागून बराच काळ लोटला आहे.उच्च शिक्षणासाठी शाळा महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत.अशावेळी कामठी तहसील कार्यालय अंतर्गत सुरू असलेले माहिती व सेतू सुविधा केंद्राचे सर्व्हर डाऊन होत साईट चालत नसल्याच्या नावाखाली सेतू सुविधा केंद्राचे पोर्टल हे कोमात गेले आहे.तर ह्या सेतू केंद्राची साईट चालत नसल्याने विद्यार्थाना पुढील प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे सेतू केंद्राच्या ऑनलाईन फाईल मध्ये अडकल्याने विदयार्थी, पालक, शेतकरी हवालदिल झाले आहेत तर मागील 15 दिवसापासून पालकवर्ग मुलांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्रात हेलपाटे मारावे लागत असल्याने पालक व विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे मात्र हा प्रकार संपूर्ण राज्यातील सेतू केंद्रात सुरू असल्याने संबंधित प्रशासनाने आपले हात वर करून जवाबदारी ढकलली आहे.तेव्हा त्रस्त नागरिकांनी कास धरावी कुणाची असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुढील वर्गाची प्रवेश प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली आहे.विद्यार्थ्यांना महाविद्यालय,पॉलिटेक्निक, आयटीआय अशा पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र , उत्पन्नाचे प्रमाणपत्र ,नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र ,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शेतकऱ्यांना लागणारे विविध कागदपत्रासाठी सेतू सुविधा केंद्राशी लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.परंतु मागील काही दिवसांपासून सेतू सुविधा केंद्राची संपूर्ण ऑनलाईन साईट आली…आली…गेली…गेली ….अशी स्थिती होऊन सगळा कारभार ठप्प झाला आहे.सेतू सुविधा केंद्राची साईट बंद असल्यामुळे कागदपत्रे कशी मिळवावी असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा होऊन ठाकला आहे.परिणामी विद्यार्थ्यांना विविध प्रवेश प्रक्रियेला खंड पडण्याची भीती निर्माण झाली आहे.महसूल विभागाने याकडे लक्ष दिले नाही तर विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी प्रवेश मिळणे व शासनाच्या फिस सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता महसूल विभागाने काहीतरी पर्याय मार्ग शोधावा अशी मागणो विद्यार्थी पालकामधून आली आहे.
विशेष बाब म्हणजे शासनाने सेतू सुविधा केंद्राचे टेंडर ज्या संस्थेला दिले आहे त्या संस्थेवर प्रशासनाचा कुठलाही अंकुश राहिला नसल्याचे उघडकीस होते.तेव्हा कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सेतू सुविधा केंद्राचे टेंडर दिलेल्या संस्थेवर कडक कारवाही करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा पदाधिकारी नरेशभाऊ वाघमारे,माजी नगरसेवक प्रशांत नगरकर, माजी नगरसेवक प्रमोद (दादा)कांबळे, कृपाशंकर ढोके, रामुजी सांगोडे, कामठी शहर अध्यक्ष दीपक वासनिक,राजेश ढोके, नितेश नागदेवें, अविनाश गजभिये, शकील अहमद, अजय मेश्राम, यशवंत शेंडे, तुषार खोब्रागडे, भाऊराव मेश्राम, सुनील बहादूरे,विकास जामगडे, संघपाल चव्हाण, अमर पिललेवान, शीतल तांबे आदीनी केली आहे.
-तहसीलदार अक्षय पोयाम
नागरिकांची आर्थिक लूट थांबून कामे पारदर्शक व्हावी यासाठीच सेतू केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.कुठल्याही विद्यार्थीचे शैक्षणिक वा आर्थिक नुकसान व्हावे हे कदापि सहन होऊ शकत नाही वा कुठल्याही पालकवर्ग वा शेतकरी वर्ग सेतू केंद्राशी संबंधित कागदपत्राच्या मागणीसाठी ताटकळत हेलपाटे मारत राहावे अशी कुठलीही अपेक्षा नाही मात्र साईट बंद व सर्व्हर डाऊनची समस्यां ही एकमेव कामठी तहसील कार्यलय अधिनस्थ सुरू असलेल्या सेतू केंद्रांचीच नाही तर संपूर्ण राज्यातील सेतू केंद्रावर ही समस्या सूरु आहे तेव्हा जिल्हाधिकारी प्रशासनाने या सेतू केंद्रात सुरू असलेली साईट बंद व सर्व्हर डाऊन च्या समस्या संदर्भात पर्यायी व्यवस्था करून द्यावे , विद्यार्थी, पालकवर्ग, शेतकरी वर्ग आदीचे हित जोपासता यावे यासाठी कामठी तहसील कार्यालय च्या वतींने जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यव्हार करण्यात आले आहेत.