भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मृगांक वर्मा या युवकाची गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) निवड झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनएफडीसी) यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात होत असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये देशभरातून चित्रपट निर्मिती क्षेत्रातील नवोदित 75 प्रतिभावंतांची निवड झाली आहे. स्पर्धेत मृगांकला चित्रपट संपादन क्षेत्रात यश मिळाले.
एसएन मोर कॉलेज, तुमसरचे माजी विद्यार्थी मृगांक वर्मा यांनी सन 2018 मध्ये शेमारू इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड टेक्नॉलॉजी, मुंबई येथून फिल्म एडिटिंग आणि ग्राफिक्समधील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्यांनी अनेक वेब सिरीज, लघुपट आणि टीव्ही मालिका इत्यादींच्या निर्मितीमध्ये संपादकाची भूमिका बजावली. गेल्या वर्षी दूरदर्शनच्या लोकप्रिय मालिका ‘लौट के आये मेरे मीत’ चे सर्व 52 भाग ऑनलाइन संपादित करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. इफ्फीसाठी देशभरातून एक हजाराहून अधिक नामांकने आली होती, ज्यामध्ये 75 प्रतिभावंतांची निवड करण्यात आली आहे. छायाचित्रण आणि चित्रपट दिग्दर्शनात विशेष रुची असलेल्या 26 वर्षीय मृगांक वर्मा यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आपली निवड ही आपल्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे म्हटले आहे.