नागपूर :- शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणतर्फ़े राबविण्यात येणा-या मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजनेंतर्गत खापरखेडा उपविभागांतर्गत नांदा येथे उभारण्यात आलेल्या सौर कृषी प्रकल्प आणि कोराडी येथील 33 केव्ही उपकेंद्रातील 11 केव्ही इनकमर वाहिनीवरील सौर इंजेक्शनची पाहणी महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी आज (गुरुवार दि. 10) पाहणी केली.
या भेटीदरम्यान ताकसांडे यांनी या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती घेत, संपुर्ण पाहणी केली. यावेळी संजय ताकसांडे यांच्याहस्ते कोराडी उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी ,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, सामुग्री व्यवस्थापन विभाग, मुंबई येथील मुख्य अभियंता मनीष वाठ, मुख्य अभियंता (देयके व महसुल) संजय पाटील, यांचेसह नागपूर ग्रमिण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता (चाचणी) अविनाश सहारे कार्यकारी अभियंता (चाचणी) योगेंद्र नीचत, कार्यकारी अभियंता (सावनेर विभाग) दिपाली माडेलवार यांच्यासमवेत खापरखेडा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पडीक जमिनीवर सौर ऊर्जेची निर्मिती करून शेतक-यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या प्रकल्पाची अंमलबजावणी महावितरणतर्फ़े राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीसौर ऊर्जा वापरून 7000 मेगावॅट वीजनिर्मिती करणे आणि 2025 पर्यंत राज्यातील 30 टक्के कृषी वाहिन्या सौर ऊर्जेवर चालविणे यासाठी ‘मिशन 2025’ आखण्यात आले आहे. सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा वापर केल्याने शेतीसाठी कमी दरात वीज उपलब्ध होणार असून उद्योगांसाठीच्या वीजदरात लागू केलेली क्रॉस सबसिडी कमी करता येईल. राज्यातील उद्योग क्षेत्राला त्यामुळे अधिक स्पर्धात्मक होणार असल्याने, या योजनेच्या यशस्वीतेसाठी महावितरणने सर्वत्र मोठ्या प्रमाणात कामे सुरु केली आहेत.