– जेष्ठ बंधूकडून संजय देशमुखांना घरचा आहेर
यवतमाळ :- मविआचे उमेदवार संजय देशमुख अवसान घातकी आहेत. ते कुणाला कधी दगा देतील याचा नेम नाही. त्यांना चुकूनही मतदान करु नका, अशा शब्दात संजय देशमुख यांचे बंधू सुधीर देशमुख यांनी घरचा आहेर दिला. संजय देशमुखांनी सत्तेच्या उन्मादात स्वकियांचा बळी दिला. त्यांच्या याच वृत्तीमुळे आम्ही त्यांना पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. असा एल्गार सुधीर देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला. सुधीर देशमुखांचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर तुफान व्हायरल होत आहे.
यवतमाळ – वाशिम लोकसभा क्षेत्राचा प्रचार शेवटच्या टप्प्यात येवून पोहोचला आहे. अशात जाहीर सभांचा धडाका सूरू आहे. प्रचाराच्या तोफा प्रचंड आग ओकत असतानाच नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत माविआचे उमेदवार संजय देशमुख यांचे जेष्ठ बंधू सुधीर देशमुख यांनी संजय देशमुख यांचे वस्त्रहरण ( चिरफाड) केली आहे. संजय देशमुख यांचे बंधू सुधीर देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या सभेत संजय देशमुखांचा पडद्यामागील खरा चेहरा समोर आणला आहे. संजय देशमुख हे अवसान घातकी आहेत. त्यांना अपक्ष उभे असताना आमदार म्हणून निवडून आणणाऱ्या सच्चा कार्यकर्त्यांना, भावंडांना, स्वकियांना देशमुख यांनी वापर करुन फेकून दिले. स्व. विलासराव देशमुख यांनी मंत्री बनविले. मात्र विलासराव देशमुख यांचे सरकार पाडण्यासाठी संजय देशमुख फुटले होते. विकल्या गेले होते त्यांना आपणच मुंबईतील एका हॉटेल मधुन कानउघाडणी करुन वापस आणल्याचा गौप्यस्फोट देखील सुधीर देशमुख यांनी यावेळी केला.
मविआचे उमेदवार संजय देशमुख यांच्याबद्दल काँग्रेस देखील शांशक आहे. एका प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरके यांनी संजय देशमुख यांच्या बद्दल बोलतांना, ‘ संजय देशमुख क्रिडा मंत्री होते, त्यांना चांगलाच खेळ खेळता येतो. ते कधी कुणाचा पाय धरून ओढतील आणि कुणाला पाडतील याचा नेम नाही. असा मिश्किल टोला लगावल्याची आठवण देखील सुधीर देशमुख यांनी यावेळी करुन दिली.
स्वतःच्या भावाकडून संजय देशमुखांवर करण्यात आलेली टिका टिप्पणी सोशल मिडियावर चांगलीच गाजत आहे. सुधीर बाप्पुंचा हा घराचा आहेर. संजय देशमुखांसाठी किती परिणामकारक ठरतो हे आता 4 जूनलाच कळेल.