अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने अमरावती शहरातील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था ते नवसारी परिसरात बुधवार दि. 16 नोव्हेंबर रोजी स्वच्छता अभियान कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. सदर अभियानाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. रजनी नेताम यांच्या हस्ते करण्यात आले. उपायुक्त डॉ. रजनी नेताम यांनी हिरवी झेंडी दाखवून या अभियानाची सुरुवात केली. यावेळी अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संचालक डॉ. अंजली देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेश बुरंगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अभियानाव्दारे रा.से.यो. च्या 135 स्वयंसेवकांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करुन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले व परिसराची स्वच्छताही केली. या कार्यक्रमासाठी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मिलिंद काळे, तसेच स्वयंसेवक अक्षय काळे व चमू यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर या स्वच्छता अभियानामध्ये परिसरातील नागरिकांनीही सहभाग घेतला.