यवतमाळ :- नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याची संधी पक्षकारांना उपलब्ध झाली आहे. ज्या पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले तडजोडीद्वारे निकाली काढावयाचे असतील अशा पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश वि. न्हावकर यांनी केले आहे.
नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दि. २९ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह होत आहे. याविशेष लोकअदालतीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, ती तडजोडीने मिटावीत, अशी इच्छा असणाऱ्या पक्षकारांची प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवता येणार आहेत.
त्यासाठी यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश वि. न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व बोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ या ठिकाणी घेण्यात येणार आहे. संबंधित पक्षकार प्रत्यक्ष वा आभासी पध्दतीने यात सहभागी होवू शकतात. तरी अशा पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश के.ए. नहार यांनी केले आहे. लोकन्यायालयाच्या माध्यमातुन सुलभ, जलद आणि मोफत न्याय मिळतो, त्यामुळे या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.