– जीवन विद्या मिशनतर्फे विश्वप्रार्थना जपयज्ञाचा शुभारंभ
नागपूर :- मला अनेक मोठ्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली. काहींनी माझ्या जीवनावर, विचार करण्यावर प्रभाव टाकला. त्यापैकी एक सद्गुरू वामनराव पै होते. महाराष्ट्र शासनात नोकरी करत असताना त्यांनी स्वतःच्या प्रतिभेने जीवन विद्या मिशनचे तत्वज्ञान तयार केले. त्यातून समाजातील लोकांना संस्कारित करून त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेकांचे जीवन बदलले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
जीवन विद्या मिशनच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात कै. वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विश्वप्रार्थना जपयज्ञाचा शुभारंभ ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रल्हाद वामनराव पै, जयंत जोशी, लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा, जीवन विद्या मिशनचे दिलीप महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. सद्गुरू वामनराव पै यांनी निःस्वार्थी भावनेतून समाजाला संस्कारित करण्याचा प्रयत्न केल्याचे ना. गडकरी म्हणाले. ‘एका पाश्चात्य तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे की, व्यक्ती आणि संघटनेत संघटना श्रेष्ठ असते. संघटन आणि विचारधारा यात विचारधारा श्रेष्ठ असते. आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही. गुण-दोष प्रत्येकात आहेत. पण प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीच्या आधारावर मार्गदर्शन मिळते तेव्हा त्या संस्कारातून माणसाचे जीवन बदलत असते. सद्गुरू वामनराव पै यांनी समाजात परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला. सुखमय जीवन कसे जगता येईल, हे सामान्य माणसाला सामान्य भाषेत समजावून सांगितले. तुमच्या जीवनात जो बदल घडवायचा आहे, तो बदल तुम्हालाच घडवावा लागेल. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, असा संदेश त्यांनी दिला. विश्वाच्या कल्याणाचा विचार त्यांनी मांडला,’ असेही ना. गडकरी म्हणाले.