– भारताचे महा वस्त्रोद्योग प्रदर्शन -भारत टेक्स 2024 मध्ये मुंबई आपल्या वस्त्रोद्योगाची ताकद दर्शवेल
– भारत टेक्स 2024 सर्व क्लस्टर्सना एकत्र येण्यासाठी आणि आपली यशोगाथा जगासमोर मांडण्याची मोठी संधी पुरवेल – रोहित कंसल, अतिरिक्त सचिव, वस्त्रोद्योग मंत्रालय
मुंबई :- ‘भारत टेक्स 2024 ‘सर्व क्लस्टर्सना एकत्र येण्यासाठी आणि आपली यशोगाथा जगासमोर मांडण्याची मोठी संधी पुरवेल, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातील अतिरिक्त सचिव रोहित कंसल यांनी म्हटले आहे. देशाचे बहुप्रतिक्षित,वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘ भारत टेक्स 2024’ बाबत वस्त्रोद्योग समुदायामध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, येथे आयोजित माहितीपूर्ण रोड शोचे प्रमुख पाहुणे म्हणून ते काल बोलत होते. भारत टेक्स 2024 मोठ्या संधी प्रदान करेल, असे त्यांनी सांगितले. सर्व क्लस्टर्सना एकत्र येण्यासाठी आणि त्यांची यशोगाथा जगासमोर मांडण्यासाठी हे वस्त्रोद्योग प्रदर्शन हा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कापड उद्योगाशी संबंधित अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असल्यावर त्यांनी भर दिला. वैयक्तिक ब्रँड, मूल्य साखळी ब्रँडचा वैयक्तिक घटक यापुरते मर्यादित न राहता वस्त्रोद्योग क्षेत्रात ‘ब्रँड इंडिया’ तयार करण्यासाठी कंसल यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राचा पाठिंबा मागितला.
महाराष्ट्र सरकारचे वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंग, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या व्यापार सल्लागार शुभ्रा यांचा रोडशोतील मान्यवरांमध्ये समावेश होता.
नवी दिल्लीतील यशोभूमी आणि भारत मंडपम येथे 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत देशाचे सर्वात मोठे वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स’ नियोजित आहे. 11 वस्त्र निर्यात संवर्धन परिषदांच्या संघाद्वारे आयोजित आणि वस्त्रोद्योग मंत्रालय समर्थित मुंबईतील रोड शोमुळे भारताच्या आगामी सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग प्रदर्शनाची भव्य सज्जता दिसून आली. राज्यात भारत टेक्स 2024 साठी या रोड शोने यशस्वीरित्या अपेक्षा आणि जागरूकता निर्माण केली. त्याद्वारे भारत टेक्स 2024 च्या माध्यमातून संधींचा लाभ घेण्याबाबत वस्त्रोद्योग समुदायाला अद्ययावत केले.
देशांतर्गत किरकोळ विक्रेत्यांसह संपूर्ण कापड मूल्य साखळीच्या उपस्थितीसह रोड शोमध्ये भारताच्या वस्त्रोद्योगाची समृद्धता आणि विविधता दर्शविली गेली.
वस्त्रोद्योगाने राज्याच्या एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाचा चांगल्या प्रकारे अवलंब करण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारचे वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंग यांनी केले. पुनर्वापर, पुनर्प्रक्रीया, शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासावरही खूप भर देण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. येणाऱ्या काळात महाराष्ट्राला गुंतवणुकीचे सर्वात पसंतीचे ठिकाण बनवण्यासाठी सरकार अभूतपूर्व पद्धतीने उद्योग क्षेत्राशी संपर्क साधेल असे ते म्हणाले. उपस्थित सदस्यांना भारत टेक्स मधे सहभागी होण्याचे त्यांनी आवाहनही केले.
भारताच्या चैतन्यशील वस्त्रोद्योग क्षेत्राची उत्कृष्टता आणि क्षमता साजरी करण्यासाठी जगभरातील उद्योगातील प्रमुख, संरचनाकार, प्रतिनिधी, खरेदीदार आणि वस्त्रोद्योगातील मातब्बरांना एकत्र आणणारी भारत टेक्स एक गेमचेंजर बनण्यासाठी सज्ज आहे. नवोन्मेष, शाश्वतता आणि जागतिक सहकार्य यावर लक्ष केंद्रित करून, भारताला आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग बाजारपेठेत आघाडीवर नेणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
भारत टेक्स 2024 हे कपडे, घरगुती फर्निचर, जाजम, तंतू, धागे, कापड, गालिचे, रेशीम, वस्त्रोद्योग आधारित हस्तकला, तांत्रिक वस्त्रोद्योग यासह बरेच काही यांचे ऐतिहासिक प्रदर्शन असेल. हा कार्यक्रम वस्त्रोद्योगातील शाश्वतता आणि पुनर्वापर, लवचिक जागतिक पुरवठा साखळी, मुद्यांवर आधारीत चर्चा आणि परस्परसंवादी प्रदर्शनाद्वारे डिजिटलीकरण, धाग्यांचे चाचणी क्षेत्रे, उत्पादन प्रात्यक्षिके आणि कारागिरांचे उत्कृष्ट वर्ग, कला जुगलबंदी तसेच जागतिक नाममुद्रा आणि आंतरराष्ट्रीय डिझायनर्सचा समावेश असलेल्या विशेष उपक्रमावर प्रकाशझोत टाकेल.