मुंबई :-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने सुरु केलेले ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे व नदी संरक्षण ही लोकचळवळ व्हावी असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.
‘चला जाणूया नदीला’ या महाराष्ट्र शासनाच्या नदी संवर्धन अभियानाचा एक भाग म्हणून खासदार आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांच्या ‘गंगा’ या नृत्य – महानाट्याचे आयोजन एनसीपीए मुंबई येथे रविवारी (दि. १९) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले.
जागतिक हवामान बदल आणि तापमान वाढ यामुळे राज्यात पूरस्थिती आणि दुष्काळाची वारंवारता वाढली आहे. शिवाय उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष तीव्रतेने जाणवत असल्याचे सांगून शासनाने नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी योजना तयार करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.
वाढत्या शहरीकरणामुळे जलस्रोत नष्ट होत आहेत व भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याचे सांगून जीवसृष्टीला वाचविण्यासाठी लोकांना अधिक जागरूक व्हावे लागेल असे राज्यपालांनी सांगितले.
नद्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच लोकांचे आरोग्य चांगले राहील असे सांगून राज्यातील १०८ नद्यांना ‘चला जाणूया नदीला’ अभियाना अंतर्गत समाविष्ट केल्याबद्दल राज्यपालांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.
‘गंगा’ नृत्य नाटिकेच्या सादरीकरणानंतर राज्यपालांच्या हस्ते हेमा मालिनी व सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, परमार्थ निकेतनचे अध्यक्ष चिदानंद सरस्वती, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, निर्माते सुभाष घई व रमेश सिप्पी, अभिनेते जॅकी श्रॉफ तसेच चित्रपट सृष्टीतील कलाकार व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.