– अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केली पाहणी
नागपूर :- मागील दोन दिवसांपासून बंद असलेली मोरभवन बस स्थानकावरील बस सेवा सोमवार २५ सप्टेंबरपासून पूर्ववत झालेली आहे. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे मोरभवन बस स्थानक परिसरातील पाणी ओसरताच स्वच्छता कार्य सुरू करण्यात आले. या संपूर्ण कार्याची पाहणी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केली.
यावेळी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, प्रभारी यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, उपअभियंता केदार मिश्रा, अरुण पिंपरूडे, झोनल अधिकारी दीनदयाल टेंभेकर यांच्यासह महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर शहरातील सीताबर्डी भागामध्ये स्थित मोरभवन बस स्थानक नाग नदीला आलेल्या पूरामुळे शनिवार २३ सप्टेंबरपासून बंदावस्थेत होते. परिसरात पाणी आणि गाळ जमा असल्याने येथील बससेवा सुरू करणे शक्य नव्हते. मात्र सोमवारी पूर्णपणे पाणी ओसरल्याने नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. परिसरात साचलेला गाळ आणि कचरा जेसीबी, टिप्परच्या मदतीने तसेच मशीनने जिथे काम शक्य नव्हते अशा ठिकाणी मनुष्यबळाद्वारे स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता कार्याकडे स्वत: अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी लक्ष दिले.
प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरात लवकर मोरभवन बस स्थानकावरील सेवा सुरू करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत प्राधान्याने अतिरिक्त आयुक्तांनी येथील स्वच्छता करवून घेतली. दुपारी २ वाजतापासून मोरभवन बसस्थानकावरील सेवा पूर्ववत सुरू झाली. याशिवाय धीरन कन्या विद्यालयापुढील बस सेवा पंचशील टॉकीज जवळील पेट्रोल पम्प समोरून सुरू करण्यात आलेली आहे.