विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
नागपूर : माहिती तंत्रज्ञानाचा कामकाजात वापर सुरू असल्याने तत्परता, गती वाढली आहे, त्यासोबतच कर्मचाऱ्यांवर तणाव देखील वाढला आहे. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव व अशा प्रकारच्या एकत्रीकरणातून तणाव कमी व्हावा, ‘खेळकर व तणाव मुक्त कर्मचारी’ ही महसूल विभागाची ओळख बनावी, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे व्यक्त केली.
नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन आज आयुक्त बिदरी यांच्या हस्ते मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, महसुल उपायुक्त मिलींद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, एन.सी.सी. चे कर्नल विशाल मिश्रा महसूल विभागातील विविध संघटनांचे पदाधिकारी याप्रसंगी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
महसूल विभागात पूर्वीच्या तुलनेत सध्या काम वाढले असून नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व्हाट्सॲप, इमेलच्या वापरामुळे प्रत्येकाला तात्काळ प्रतिसाद देवून कामे मार्गी लावावे लागतात. अशावेळी एकत्रीकरण गेट-टुगेदर क्रीडा व कला गुण प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे तणाव हलका होण्यास मदत होते. कर्मचाऱ्यांनी तणाव मुक्तीच्या कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
महसूल कर्मचारी प्रशासनाचा कणा असून प्रचंड कामे या विभागामार्फत होत असतात यामध्ये उत्तरोत्तर वाढत होत आहे. नुकतेच सेवा पंधरवाड्यानिमित्त विभागात 13 लाख अर्ज निकाली काढण्यात येवून लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपुर्वी 1100 कोटी मदतनिधीचे वाटप, हिवाळी अधिवेशन, भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक अशी एकामागून एक सातत्याने कामे सुरू आहेत. या सर्व कार्यक्रमात महसूल विभागाने चांगले काम केले आहे. कामे सुरूच राहतील, मात्र सर्वांनी एकत्र मिळून या स्पर्धेत सहभाग घ्यावा व क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने कामाचा ताण घालवावा. नुकतेच महसूल मंत्री यांनी विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी दरवर्षी प्रत्येक महसूल विभागाला 25 लाख रुपये व राज्य महसूल क्रीडा स्पर्धेसाठी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा केली असल्याचे आयुक्त बिदरी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रास्ताविकेतून क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजनाची माहिती दिली. कोरोनानंतर प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत 81 क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी विभागातील सुमारे 1200 ते 1500 महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सर्व स्पर्धेचे आयोजन मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे तसेच क्रीकेट सामना व्ही.सी.ए. मैदान व पोहण्याची स्पर्धा नागपूर महानगरपालिकेच्या तरणतलावावर आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विभागीय महसूल कर्मचारी संघटनेचे राजू धांडे, विदर्भ पटवारी महासंघाचे संजय अनवाने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी क्रीडास्पर्धेचे ध्वजारोहण केले व क्रीडाज्योत प्रज्वलीत करून खेळाडूंना खिलाडू वृत्ती जोपासण्याची शपथ दिली. यावेळी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या खेळाडू पथकाने संचलन करून त्यांना मानवंदना दिली. गणपती वंदन नृत्याने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी व्यक्त केले.
क्रीडा स्पर्धा उद्घाटनानंतर 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आली. यात पुरूष गटात गोंदियाच्या प्रणय कापगतेने 12.57 मिनिटात हे अंतर कापून प्रथम क्रमांक पटकावला. भंडाऱ्याचा अमोल फेंडर दुसरा तर गडचिरोलीचा गुलशन पटले तिसऱ्या स्थानी होते. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत गडचिरोलीच्या स्नेहा टोहलियाने 14.56 मिनीटाची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक तर चंद्रपूरच्या मनिषा माटेने दुसरा व भंडराच्या अर्चना देशमुखने तिसरा क्रमांक पटकावला. उत्कृष्ट संचलन संघ म्हणून नागपूर प्रथम, गडचिरोली द्वितीय व गोंदिया जिल्ह्याची तृतीत क्रमांकावर निवड करण्यात आली. दुपारी व्ही.सी.ए. मैदानावर क्रीकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. मानकापूर क्रीडा स्टेडियम च्या प्रत्येक क्रीडा मैदानावर आपापल्या जिल्ह्याच्या परिधानामध्ये कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे मानकापूर स्टेडियम कर्मचाऱ्यांच्या उत्साहाने ओसंडून वाहत होते.
कार्यक्रमाला महसूल व क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विभागीय तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना, मंडळ अधिकारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, पटवारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.