जिल्ह्यात ‘हर घर झेंडा’ अभियानाला प्रतिसाद

– घराघरावर लागला राष्ट्रध्वज ; 15 ऑगस्टपर्यंत लावता येणार झेंडा

नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर सध्या १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत भारतीय नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे. हर घर तिरंगा या अभियानांतर्गत नागपूर शहरात व जिल्हयात नागरिकांनी मोठया संख्येने तिरंगा घरांवर दिमाखाने उभारला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत समस्त नागरिकांनी झेंडा उभारावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याची स्मृती तेवत राहावी, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी जनमाणसात राहावी, दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्याच्या उद्देशाने ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम 15 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे.

ध्वजसंहितेचे पालन करा

या उपक्रमाअंतर्गत सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, शाळांमध्ये तिरंगा ध्वज लावण्यात येत आहे. घरी व कार्यालयात ध्वज उभारताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामध्ये, ध्वजाचा जमिनीशी स्पर्श होवू नये, ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षरे लिहू नये, कोणतीही वस्तू देण्याचे, घेण्याचे बांधण्याचे किंवा वाहन नेण्याचे साधन म्हणून तसेच इमारतीचे आच्छादन म्हणून ध्वज वापरता येणार नाही. सन्मानपूर्वक ध्वज लावावा व १५ ऑगस्टला सायंकाळी सन्मानपूर्वक उतरवावा, असे सूचित करण्यात आले आहे.

खाजगी आस्थापनांवरही ध्वज

अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, अंगणवाडया, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्थांच्या ठिकाणी राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खाजगी आस्थापनांवर ध्वज लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी हे अभियान जिल्ह्यात मोठया प्रमाणात राबविण्यात आले आहे. यावर्षी देखील नागरिकांनी मोठया संख्येने आपल्या घरावर ध्वज लावून अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्लास्टीक व कागदी ध्वज वापरू नका

स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर हे राष्ट्रध्वज मैदानात व रस्त्यांवर पडलेले असतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी कागदी व प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते 'वसुधा वंदन' अंतर्गत वृक्षारोपण

Mon Aug 14 , 2023
– अमृत वाटिका येथे 75 देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती, माझा देश अर्थात मेरी माटी मेरा देश अभियानातील ‘वसुधा वंदन’ उपक्रम रविवारी (ता. १३) रोजी राबविण्यात आला. चिंचभवन वर्धा रोड स्थित वायुसेना ऑफिसर्स मेस परिसरात केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसरात अमृत वाटिका तयार करण्यात आली असून येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!