इंडिया हटाओ… भारत बनाओ..

आपल्या देशाचे नाव जसे भारत आहे, तसेच त्याचा इंग्रजीत उल्लेख इंडिया असाही केला जातो. आपल्या संविधानाच्या  प्रास्ताविकेतच इंडिया दॅट इज भारत” असा उल्लेख केलेला आहे. हा इंडिया असा उल्लेख रद्दबातल करून भारताचे नाव जगभरात फक्त भारत हेच प्रतिष्ठित करावे अशी मागणी करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली असून याचिकाकर्त्याने यासंदर्भात केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यालयाकडे पाठपुरावा करावा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे अशीच मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयानेही २०२० मध्ये फेटाळून गृहमंत्रालयाकडे पाठपुरावा करावा असे निर्देश दिले असल्याची बातमीही आहे.

माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण जगात अशी दोन नावे असलेला एकच देश हा भारत असावा. अन्यथा सर्व देशांची नावे बघितल्यास एकच नाव असल्याचे आणि ते जगभरात प्रतिष्ठित केले असल्याचे आढळून येते. मात्र भारतालाच कोणी हिंदुस्थान असेही म्हणतात, तर इंग्रजीत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.

इतिहास तपासल्यास वैदिक काळात भरत नावाचा राजा या परिसराचा सार्वभौम राजा होता, म्हणून भारताचा भारत असे या देशाचे नाव पडले, अशा नोंदी सापडतात. ज्यावेळी मुस्लिम लोक या देशात आले त्यावेळी सिंधू नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणून ते या देशाला ओळखत होते. मुस्लिम बोलायचे त्या फारसी भाषेत स चा उच्चार ह असा केला जातो त्यामुळे सिंधू नदीच्या काठचा म्हणजेच हिंदू नदीच्या काठचा हिंदुस्थान असे बोलले जाऊ लागले, असेही काही अभ्यासक सांगतात. मात्र पौराणिक आणि वैदिक काळाचा अभ्यास करणारे लोक हिंदू हे वैदिक काळापासून इथे होते, आणि त्यामुळेच या देशाचे नाव हिंदुस्थान पडले असा दावा करतात.

या देशावर साधारणपणे आठव्या किंवा नवव्या शतकात मुस्लिमांचे आक्रमण होणे सुरू झाले. नंतर हळूहळू संपूर्ण देशात मुस्लिमांनी आपली सत्ता जमवली होती. साधारणपणे पंधराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठ्यांचे राज्य स्थापन करण्यास सुरुवात केली आणि ते मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाले. त्यांच्यानंतर मराठ्यांच्या साम्राज्याची धुरा आधी छत्रपती संभाजी महाराज नंतर राजाराम महाराज आणि नंतर पेशव्यांनी सांभाळली. याच काळात कधीतरी देशात व्यापारासाठी इंग्रज आले होते. त्यांनी हा देश सिंधू नदीच्या काठचा म्हणजेच हिंदुस्थान असा लौकिक ऐकला होता. ते इथे आल्यावर त्यांनी सिंधू नदीचे नामकरण इंडस असे केले. आणि इंडस व्हॅलीच्या भोवतालचा प्रदेश म्हणून याचे नाव इंडिया असे ठेवले असा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका ग्रंथात असल्याची माहिती आहे. इतरही जाणकार अशीच माहिती देतात.

या संदर्भात आणखीही एक माहिती सांगितली जाते. इंग्रज या देशात सर्वप्रथम दक्षिणेतून आले. त्याआधी त्यांचे आफ्रिकेत सुद्धा साम्राज्य होते. आफ्रिकेतील आदिवासींना रेड इंडियन असे म्हणतात. इंग्रज भारतात आले ते दक्षिणेत. दक्षिणेत राहणारे नागरिक हे उत्तरेतील नागरिकांच्या तुलनेत बरेच काळे आहेत. इंग्रजांच्या तुलनेत तर ते काळेच होते. त्यामुळे हे काळे नागरिक म्हणजे आफ्रिकेतील रेड इंडियन्स प्रमाणेच असावेत असे समजून इंग्रजांनी त्यांचा उल्लेख इंडियन असा केला, आणि त्यामुळे त्यांनी या प्रदेशाचे नाव इंडिया असे ठेवले असेही काही जाणकार सांगतात.

त्यामुळेच भारतात व्यापार करण्यासाठी इंग्रजांनी जी पहिली कंपनी स्थापन केली तिचे नाव ईस्ट इंडिया कंपनी असे ठेवले होते. हळूहळू इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी म्हणून येत या देशावर आपला कब्जा जमवला. एक एक संस्थान खालसा करीत संपूर्ण देशावर आपली अनिर्बंध सत्ता जमवली. आधीच्या हिंदुस्तान मध्ये आजचा भारत त्याशिवाय आजचा श्रीलंका, आजचा म्यानमार, आजचा बांगलादेश, आजचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा काही भाग इतका समाविष्ट होता अशी माहिती मिळते. या संपूर्ण प्रदेशाची इंग्रजांच्या दप्तरी नोंद इंडियन कॉन्टिनेन्ट अशी होती अशी माहिती मिळते.इंग्रजांनी राज्य करण्यासाठी येऊन हळूहळू फूट पाडत या देशाचे तुकडे केले. आधी श्रीलंका म्हणजे इंग्रजांचे नाव सिलोन हा वेगळा केला. त्याच दरम्यान तत्कालीन ब्रह्मदेश म्हणजेच आजचा म्यानमार वेगळा केला. मग स्वातंत्र्य देताना पाकिस्तानलाही वेगळे केले. मात्र पाकिस्तानही पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान अशा दोन तुकड्यात वाटला. त्याच दरम्यान भारत स्वतंत्र झाला.नंतर जवळजवळ २४ वर्षांनी पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यात पटेनासे झाल्यामुळे पूर्व पाकिस्तान वेगळा होत बांगलादेश झाला.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंतप्रधान बनलेले पंडित जवाहरलाल नेहरू हे इंग्रज धार्जीणेच पंतप्रधान होते. त्यांनी आपण पंतप्रधान व्हावे यासाठी स्वातंत्र्य मिळवताना काँग्रेसचे नेते या नात्याने इंग्रजांशी बऱ्याच तडजोडी केल्या होत्या असाही दावा

जाणकार करतात. नेहरू जरी पंतप्रधान होते तरी इंग्रजांनी आपले गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन यांना काही काळ ठेवले होते. ज्यावेळी संविधान लिहिले गेले त्यावेळी देशाचे नाव भारत असावे असा अनेकांचा आग्रह होता. मात्र नेहरूंच्या अनाठायी हट्टामुळे संविधानात प्रास्ताविकेत “इंडिया दॅट इज भारत” असा उल्लेख केला गेला. तेव्हापासून देशात काही ठिकाणी या देशाचा उल्लेख भारत असा केला जातो, तर इंग्रजी भाषेत आणि विशेषतः परदेशात जागतिक स्तरावर या देशाचा उल्लेख इंडिया असाच केला जातो.

इंडिया हा उल्लेख काढून या देशाचे नाव जागतिक स्तरावर भारत असेच प्रतिष्ठित करावे अशी मागणी विविध स्तरातून बऱ्याच वर्षांपासून होते आहे. मात्र आतापर्यंतच्या काँग्रेसचे सरकारांनी त्याला दाद दिली नाही. माझ्या आठवणीनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी संसदेत भारताच्या संविधानातून इंडिया हे नाव हटवले जावे आणि भारत हेच नाव प्रतिष्ठित करावे यासाठी एक अशासकीय विधेयकही आणले होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंडिया हे नाव संविधानातच समाविष्ट केलेले असल्यामुळे देशात अनेक ठिकाणी इंडिया हेच नाव सर्रास वापरले गेलेले आहे. अगदी उदाहरणे द्यायची झाली तर युनियन ऑफ इंडिया, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, रिझर्व बँक ऑफ इंडिया, इंडियन रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन पिनल कोड, अशी अनेक उदाहरणे देता येतील. देशात मोदींचे सरकार आल्यावर भारत हे नाव प्रतिष्ठित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत आहे. नुकतीच तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी एका भाषणात ही मागणी केली होती. देशात आणि जगात भारत हेच नाव प्रतिष्ठित झाले तर प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटेल अशा आशयाचे वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यानंतर थोड्याच दिवसात देशात जी २० परिषद पार पडली. या परिषदेचे यजमानत्व भारताकडे प्रथमच आले होते. या परिषदेच्या प्रतिनिधींना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांनी स्नेह भोजनाला निमंत्रित केले होते होते . त्यावेळी त्यांनी पाठविलेल्या निमंत्रण पत्रिकांवर आवर्जून प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला होता. या परिषदेतही अनेक ठिकाणी इंडिया ऐवजी भारत असाच उल्लेख भारतीय वक्त्यांनी केल्याचे वृत्त प्रसारित झाले होते.

मात्र यावेळी देशातील इंग्रजधार्जीण्या विरोधकांनी या प्रकारावर जोरदार टीकाही केली होती. आज या घटकेला इंडिया हे नाव काढून प्रत्येक ठिकाणी भारत हे नाव प्रतिष्ठित करायचे तर त्यासाठी काही हजार करोड रुपयांचा खर्च येईल. तो आपल्याला परवडणार आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला होता आणि हा पैसा विकास कामासाठी वापरता येईल असा सल्लाही त्यांनी दिला होता. मात्र मोदी सरकारने त्याला दाद दिली नाही हा भाग वेगळा.

असे असले तरी इंडिया हे नाव आजही पूर्णपणे हटवले गेलेले नाही. ते हटवले जाण्याची खरोखरी गरज आहे. आज वैदिक काळापासून मिळालेले भारत हे नाव घेऊन सन्मानाने आम्ही भारतीय आहोत असे सांगणे अभिमानाचे, की इंग्रजांनी दिलेले इंडियन हे नाव घेऊन आफ्रिकेतील रेड इंडियन्स या मागास आदिवासींशी आपली तुलना करून घेणे योग्य, याचा निर्णय आम्हाला घ्यावाच लागणार आहे.

त्यासाठी संविधानात दुरुस्ती करून प्रास्ताविकेतील इंडिया हा उल्लेख कायमचा हटवावा लागेल. जागतिक स्तरावर देखील इंडिया हे नाव हटवून भारत या नावाचाच आग्रह धरावा लागेल.

भारतात राहणारा प्रत्येक माणूस हा मुळातच भारतीय आहे. मात्र तो परदेशात गेला की इंडियन होतो, इतकेच काय तर भारतातही आम्ही इंडियन आहोत हे सांगण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. जेव्हा इंडिया हे नाव संविधानातून हटवले जाईल आणि त्यानंतर आम्ही प्रत्येकाने आम्ही इंडियन नाही तर भारतीय आहोत हे आपल्या मनाशी ठरवून आम्ही वागू तेव्हाच या देशात खराखुरा राष्ट्राभिमान जागृत होईल आणि पुढची पिढी खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रभक्त पिढी म्हणून ओळखली जाईल. त्यासाठी संविधानातून इंडिया हे नाव हटवणे गरजेचे आहे. आज गृहमंत्रालयाकडे पाठपुरावा करावा असे उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने त्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे. त्यासाठी “इंडिया हटाओ भारत बनाओ” ही मोहीमच राबवली जाणे गरजेचे आहे. ती आजची गरज आहे.

– अविनाश पाठक

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रनाळा येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी

Mon Mar 17 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती युवा चेतना मंच व कामठी महीला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी महीला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बैंक येथे बैंकेचे संचालक नितीन ठाकरे, पालक संचालक नरेश सोरते, दिव्यांग फाऊंडेशनचे सचिव बाॅबी महेंद्र, जेष्ठ नागरिक कुमुद सगदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!