मराठी भाषेतील साहित्य व्यवहार सर्व माध्यमांवर सर्वदूर पोहोचावा, “भाषा विकासाच्या नव्या दिशा” विषयावरील परिसंवादाचा सूर

नागपूर :- कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेवर होत असलेले आक्रमण थोपवून धरण्याकरिता मराठी भाषेतील विविध साहित्य व्यवहार सर्व माध्यमांवर सर्वदूर पोहोचण्याची गरज असल्याचा सूर “भाषा विकासाच्या नव्या दिशा” विषयावरील परिसंवाद निघाला.

महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्याच्या औचित्याने येथील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात परिसंवाद आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी अर्थतज्‍ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते.

सुप्रसिद्ध कथाकार विजय तांबे, चिंतनशील लेखक मिलिंद कीर्ती आणि भाषा संचालनालयाच्या माजी सहसंचालक अनुराधा मोहनी यांनी यावेळी विचार मांडले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि भाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक हरीश सूर्यवंशी यावेळी मंचावर उपस्थित होते.

विजय तांबे यांनी ‘मानवी सर्जनशीलता आणि भाषा’ विषयावर प्रकाश टाकला. चॅट जीपीटी, बार्ड ,बिंग आदी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे साहित्यिक व्यवहारात होत असलेल्या घुसखोरीबद्दल त्यांनी विविध उदाहरणांद्वारे माहिती दिली. साहित्य, संगीत, कला आदी क्षेत्रांमध्ये दडवून ठेवलेली सर्जकता आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सर्वत्र पसरल्याचे वास्तवही त्यांनी विविध उदाहरणांद्वारे मांडले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानामुळे होणारे संपत्तीकरण, वाढणारी बेरोजगारी आदी येत्या काळातील ५व्या औद्योगिक क्रांती समोरील समस्या त्यांनी मांडल्या. १९९०नंतर विचारवंतांच्या लिखाणात या परिस्थितीची अंधुक कल्पना देण्यात आल्याचे अधोरेखित करत भाषिक मुल्यांच्या आधारावर या समस्येला पुढे जावे लागेल व सर्जकतेच्या कक्षांचा विस्तार करावा लागेल असे विचार त्यांनी मांडले.

वर्ष १९९० आणि २००८ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीचा संदर्भ देऊन मिलिंद कीर्ती यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषा’ हा विचार मांडला. आर्थिक मंदीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राद्वारे समाजमन मनोरंजनात गुंतविण्यासाठी होत असलेल्या विभिन्न प्रयोगाबद्दलही त्यांनी यावेळी विचार मांडले. कृत्रिम बुद्धिमत्तेची सध्या प्राथमिक स्थिती असून यामुळे निर्माण झालेले भाषेपुढील प्रश्न हे येत्या काळातील या तंत्रज्ञानाच्या ऑटोनॉमस आणि परसेप्शन या पुढील टप्प्यात आणखी जटील होत जातील आणि त्यासाठी मराठी भाषेतील साहित्यिक व्यवहार सक्षमपणे होवून हे आव्हान स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

‘ज्ञानभाषा मराठी-संभाव्यता आणि दिशा’ याबद्दल अनुराधा मोहनी यांनी विचार व्यक्त केले. मानवी भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी भाषेची गरज असल्याचे अधोरखित करून त्यांनी मराठी मातृभाषेतून जास्तीत-जास्त साहित्य आणि भाषिक व्यवहार होऊन या भाषेचा ज्ञानभाषेकडे प्रवास होण्याची गरज असल्याची मांडणी केली. इंग्रजी भाषेकडे वळलेला समाज आणि मातृभाषेकडे समाजाने फिरवलेलीपाठ हे वास्तव त्यांनी मांडले.परिसर विज्ञानात मराठीचा वापर, मराठी परिभाषेचा वापर होण्यासाठी बीज ग्रंथ निर्मिती, गटचर्चा, प्रश्नोत्तरे आदींच्या माध्यमातून मराठी भाषा व्यवहार व्हावे ,अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञामुळे मानवी सर्जकता,विचार प्रणालीवर व भाषिक व्यवहारावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज डॉ. खांदेवाले यांनी अध्यक्षीय उद्बोधनात व्यक्त केली. शहरांसोबतच ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या आकर्षणामुळे

व्यवहारातील अतिक्रमणही त्यांनी विविध उदाहरणांद्वारे उलगडून दाखवले. भाषिक स्वातंत्र्य अबाधीत राखण्यासाठी भाषांची संरचना वाचविणे व ती जनसामान्यापर्यंत जास्तीत – जास्त प्रमाणात व सहज पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तत्पूर्वी, युगवाणी चे संपादक प्रफुल्ल शिलेदार यांनी प्रास्ताविक केले.भाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक हरीश सूर्यवंशी यांनी संचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रदीप दाते यांनी विदर्भ साहित्य संघाच्यावतीने मराठी भाषा संवर्धनासाठी भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. प्रा. विवेक अलोनी यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

NewsToday24x7

Next Post

कराटेमध्ये नॅशनल शोतोकानला जेतेपदाचे दुहेरी मुकुट - खासदार क्रीडा महोत्सव

Thu Jan 25 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेमध्ये नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाने मुली व मुलांच्या गटात सर्वाधिक पदकांची कमाई करीत विजेतेपदाचे दुहेरी मुकुट आपल्या नावे केले आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे बुधवारी (ता.24) कराटे स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये 14 वर्षावरील वयोगटात नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया (एनएसकेए) मुलींच्या गटात 111 तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com