– इंदोरा विहारात बाबासाहेबांना मानवंदना
– विमानतळ परिसरात महामानवाचा जयघोष
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमी येथील संविधान स्तंभाजवळ प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संविधानाचे पालन करण्याची ससाई यांनी उपस्थितांना शपथ दिली.
भदंत सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी येथे बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित अनुयायांनी स्तुपाच्या आत बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेतले. यावेळी ससाई संविधान स्तुपाजवळ संविधानाच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शन करून उपस्थितांना शपथ दिली. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे.
तत्पूर्वी ससाई यांनी इंदोरा बुद्ध विहाराच्या प्रांगणातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन यावेळी बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला. यानंतर इंदोरा चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. याशिवाय संविधान चौक, विमानतळ येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. भदंत ससाई यांनी चारही ठिकाणी संविधानच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते महानाग, भंते नागवंश, भिक्षुनी संघप्रिया, संघशीला, गौतमी, पुणीका, रवी मेंढे, शैलेश सवाईथुल, अशोक गोवर्धन, आतिश शेंडे, मितेश सवाईथुल, जसवीन पाटील, अविनाश सवाईथुल, आर्यन सवाईथुल, नितीन मेश्राम, गोलू मेश्राम यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.