संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प काल गुरुवारी लोकसभेत सादर केला.या अर्थसंकल्पाविषयी कामठी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महासत्तेकडे नेणारा अर्थसंकल्प – अजय अग्रवाल
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठी क्रांती होत आहे.देश सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व्यक्त करीत आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाची प्रतिमा अत्यंत प्रभावशाली राहिली असून देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.ही वाटचाल यशस्वी होण्यासाठी काल सादर झालेला अर्थसंकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.आगामी काळात भारत आर्थिक महासत्ता नक्की होईल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अजय अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
विकसित भारत घडविणारा अर्थसंकल्प – कपिल गायधने
–केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प विकसित भारत घडविणारा आहे.सक्षम शेतकरी ,सक्षम भारत त्यादृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे.जय जवान जय किसान ,जय विज्ञान ,जय अनुसंधान यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करीत आहेत.आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सर्व सामान्यांची स्वप्नपूर्ती हीच मोदी सरकारची गॅरंटी आहे अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चा चे प्रदेश सचिव कपिल गायधने यांनी दिली.
हा तर ऐतिहासिक अर्थसंकल्प – अनिल निधान
– केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो अतिशय कौतुकास्पद आहे.महिलांच्य उन्नतीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हा अर्थसंकल्प फारयदेशीर ठरणार आहे.या अर्थसंकल्पामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर जाण्यासाठीचा मार्ग सुकर झाला असल्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिकारी अनिल निधान यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा अर्थसंकल्प – सुरेश भोयर
– मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला जात नाही .दिवसेंदिवस केंद्र सरकार शेतकऱ्यांचा शेतीमाल असताना सुद्धा इतर देशातून शेतीमाल आयात करते ,त्यामुळे शेतीमालाचे भाव कोसळत आहेत.या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या बाजूने कोणताही निर्णय घेतला गेला नाही .नुकतेच सोयाबीन पिकाचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शायनिंग इंडिया म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा अर्थसंकल्प सादर केला असल्याचे मत माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी व्यक्त केले.
– देशोधडीला लावणारा हा अर्थसंकल्प- प्रा अवंतिका लेकुरवाडे
– देशातील महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणतेही उपाययोजना या अर्थसंकल्पात नसून हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी कसा?असा प्रश्न उपस्थित करत प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे म्हणाले की या अर्थसंकल्पात मागासवर्गीय, आदिवासी ,मुस्लिम, ओबीसी ,मराठा,यासह राज्यातील कोणत्याही समाज प्रवर्गाला या अर्थसंकल्पाचा फायदा होणार आहे असे कुठेच या अर्थसंकल्पात दिसून येत नाही त्याचबरोबर या अर्थसंकल्पात काहीच मिळणार नसून हा अर्थसंकल्प देशोधडीला लावणारा अर्थसंकल्प असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीचा जुमला-काशिनाथ प्रधान
– लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला यामध्ये शेतकऱ्यांचे कोणतेही हित जपले नाही त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे त्याचबरोबर या अर्भसंकल्पात बेरोजगारी विषयी कोणतेही आश्वासन दिले नाही हा अर्थ संकल्प देशहिताचा नसून सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याची प्रतिक्रिया कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यांनी व्यक्त केली.