– एका सुवर्ण पदकासह एकूण पाच पदकांची कमाई
नागपूर :-ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वुशू (महिला व पुरुष) चॅम्पियनशिप स्पर्धा चंदिगड विद्यापीठ मोहाली येथे ७ फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पार पडली. या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या खेळाडूंनी पाच पदकांची कमाई केली आहे. यात एक सुवर्ण, एक रौप्य तर तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.
ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी वुशू (पुरुष व महिला) चॅम्पियन स्पर्धेत अग्निहोत्री महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिवानी देवासे हिने सुवर्णपदक प्राप्त केले. आश्लेषा वर्मा, जानवी टिचूले व रुचिता टेंभेकर यांनी संयुक्त पणे रौप्य पदक पटकाविले. मोहित यादव, आर्यन यादव व दृष्टी सुरेश नेरिकर यांनी देखील प्रत्येकी एक कांस्यपदके पटकाविली. क्रीडा प्रशिक्षक म्हणून प्रफुल्ल भीमराव गजभिये, क्रीडा मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीराम आगलावे यांनी कार्य पाहिले. विजेत्या खेळाडूंचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, गुलाब नबी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक सिंग, सेवादल महिला महाविद्यालय नागपूरचे विभाग प्रमुख प्रा. शरद बाखडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.