“रामलला के पटवारी”

फार पूर्वीपासून, अगदी राजेशाहीपासून आजच्या लोकशाहीपर्यंत, जमीन हाच सरकारी खजिन्यातील महसुली उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. या जमिनीचे व्यवहार महसूल खात्याकडे असतात आणि या खात्यातील सर्वात महत्त्वाचा माणूस असतो पटवारी किंवा तलाठी. जमिनीच्या मालकीचा मूळ दस्तैवज असलेला सात/बारा पटवाऱ्याच्याच हाती असतो. त्यातील नोंदी, दुरुस्त्या, नामांतर, हस्तांतरण आदींचे अधिकार त्याच्याकडे असतात. अनेक जमिनींची कागदपत्रं एकावेळी सांभाळण्याची कसरत पटवाऱ्यालाच करावी लागते. त्यामुळे जमिनीच्या खरेदीविक्री व्यवहारात त्याची भूमिका अत्यंत मोलाची, सर्वाधिक महत्त्वाची असते.

पण, देशात एक पटवारी असाही आहे, जो महसूल खात्याचा सेवक नव्हता, तरीही पटवाऱ्याचं काम वर्षानुवर्ष स्वेच्छेनं अन् विनावेतन करीत आला आहे. या अफलातून पटवाऱ्याचं नाव आहे चम्पत राय. हे नाव ऐकल्यासारखं, वाचल्यासारखं वाटतंय् ना ? अगदी बरोबर. तेच हे चम्पत राय. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस. कट्टर रामभक्त, अभ्यासू प्राध्यापक आणि योद्धा स्वयंसेवक. ते मुळात प्रोफेसर होते. पण उत्तर प्रदेशातील रामभक्त जनता त्यांना प्रेमानं “रामलला का पटवारी” म्हणूनच ओळखते गेली 35-40 वर्षे ते रामजन्मभूमी खटल्यात उपयोगी पडतील अशी कागदपत्रं रामललाच्या वतीनं गोळा करण्यात मग्न होते. यातीलच काही पुरावे खटल्यात निर्णायक ठरले आणि निकाल रामललाच्या बाजूनं लागला. त्यामुळे श्रीरामजन्मभूमीचं प्रकरण नीट मार्गी लावण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे, त्या यादीत चम्पत राय यांचं नाव आपोआपच समाविष्ट झालं.

आजच्या नवनिर्मित रामलला मंदिराचे ठळक शिल्पकार ठरवायचे तर ती यादी पुढीलप्रमाणे होऊ शकते- रामजन्मभूमी मुक्तीचे कल्पक योजनाकार रा. स्व. संघाचे मोरोपंत पिंगळे, आंदोलनांचे सूत्रधार विश्व हिदू परिषदेचे अशोक सिंघल, साध्वी उभा भारती, साध्वी ऋतंभरा, रथयात्रेद्वारे विषय देशभर नेणारे भाजपा नेते लालकृष्ण अडवानी, महंत नृत्यगोपालदास, परिश्रमपूर्वक कागदोपत्री पुरावे गोळा करणारे चम्पत राय, त्याआधारे खटल्यात बिनतोड युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील के. पाराशरन् आणि हिंदूंना ‘न्याय’ देणारं भारताचं सर्वोच्च न्यायालय. यातील महंत नृत्यगोपालदास हे नव्या न्यासाचे अध्यक्ष असून, चम्पत राय ‘पटवारी’ यांना सरचिटणीस नेमण्यात आलं आहे.

चम्पत राय यांना पटवारी ही उपाधी मिळवून देणारी त्यांची कामगिरी‌ अफलातूनच आहे. या माणसानं खटल्यात कामी येऊ शकतील अशी कागदपत्रं गावोगावी फिरून गोळा केली. अक्षरश: तहानभूक विसरून. तेही वर्षानुवर्ष. त्यांनी अयोध्येभोवतीच्या जुन्या अवध प्रांतातील जवळजवळ प्रत्येक गावातील अक्षरश: एकेका घरात जाऊन रामजन्मभूमीशी संबंधित काही कागदपत्रं मिळतात का, याचा शोध घेतला आणि जुनी कागदपत्रं मिळवली. हे काम सोपं नव्हतं. पण, चम्पत राय यांनी ते यशस्वीपणे करून दाखविलं.

– विनोद देशमुख

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोख्ता भवनच्या जागेवर वाणिज्यिक संकुल प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात

Wed Jan 24 , 2024
– ६३५३ चौरस मीटर जागेत प्रकल्प, पार्कींगसाठी तीन तळघर, सामाजिक सभागृह नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या गांधीबाग येथील जागेवर जीर्णावस्थेत असलेल्या सोख्ता भवन इमारतीच्या जागेवर डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट ॲण्ड सेल (डीबीएफएसएम) तत्वावर वाणिज्यिक संकुल बांधकाम प्रकल्पास नागपूर महानगरपालिकेद्वारे मंजुरी प्रदान करण्यात आलेली असुन या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र शासन प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अन्वये सोख्ता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com