– लाखो रुपये किमतीचे दागिने चोरी
नागपुर :- चेन्नई-जोधपूर, काजीपेठ- दादर एक्सप्रेस लक्ष्य रेल्वेत चोरी करणार्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी पकडले. सतीश चाबुकस्वार (32) रा. औरंगाबाद, विक्रम सुकनगे (31) रा. नांदेड, कैलास एरने (37) रा. अहमदनगर आणि अरुण दरेकर रा. नाशिक अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून सात लाख रुपये किमतीचे दागिने, 2 लाख 24 हजारांचे 13 मोबाईल, ट्रॉली बॅग, असा एकूण 9 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बिलासपूर येथील रहिवासी फिर्यादी परमानंद खत्री हे पाटना एक्सप्रेसने पत्नीसह प्रवास करीत असताना बल्लारशाह रेल्वे स्थानकाजवळ आरोपींनी त्यांच्या पत्नीची पर्स चोरली. पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख 18 हजार रुपये असा एकूण 4 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक तपास केला तसेच गुप्त बातमीदारांची मदत घेतली. आरोपी अरूण आणि कैलास दोघेही पुन्हा चोरीच्या तयारीत होते. योजना आखण्यासाठी ते वरंगलच्या लॉजमध्ये असल्याची गुप्त माहिती पोलिस हवालदार महेंद्र मानकर यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून दोघांनाही पकडले. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे बल्लारशाह येथील लॉजमध्ये दडून बसलेल्या सतीश आणि विक्रमलाही पडकले. चौघांनाही पोलिस ठाण्यात आणून त्यांची सखोल चौकशी केली. त्यांनी वर्धा, नागपूर, ईटारसी, बल्लारशा येथे चोरी केल्याची कबुली दिली. इतर गुन्ह्यातील चोरीचे दागिने वितळवून 140 ग्रॅम (किंमत 7 लाख) लगड तयार केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, हवालदार महेंद्र मानकर, विनोद खोब्रागडे, नितीन शेंडे, गिरीश राऊत, मंगेश तितरमारे यांनी केली.
कोरोनाकाळात आखली चोरीची योजना
सतीश हा पदवीधर असून स्पर्धा परीक्षा द्यायचा. मात्र, त्याला यश आले नाही. बिअर बारमध्ये इतर आरोपींची ओळख झाली. त्यांनी चोरीची योजना आखली. सुरुवातीला केवळ मोबाईल चोरायचे. मोबाईल चोरी प्रकरणात मनमाडला अटक करण्यात आली होती. हिंमत वाढल्याने त्यांनी बॅग चोरी केली. पाटना विशेष रेल्वे, हिसार एक्सप्रेस, चेन्नई जोधपूर एक्सप्रेस, काजीपेठ दादर एक्सप्रेस आदी गाड्यांमध्ये ते चोरी करायचे.