मुंबई :- पुणे शहरातील धानोरी कालवड, येरवडा व लोहगाव परिसरात 4 जून 2024 रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला. धानोरी रस्त्यावरून पावसाचे पाणी काही नागरिकांची घरे व दुकानांमध्ये शिरले. या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सदस्य भीमराव तापकीर, अशोक पवार यांनीही भाग घेतला.
मंत्री सामंत म्हणाले की, पुणे शहरातील धानोरी कालवड, येरवडा व लोहगाव परिसरातील नुकसानाबाबत पुन्हा सर्वेक्षणाच्या आयुक्तांना सूचना देण्यात येतील. पुणे शहरात भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास पूर येवून होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनांचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येईल. याबाबत पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.