– दिग्रस, दारव्हा, नेर येथे २७ ते २९ दरम्यान आयोजन
यवतमाळ :- दिव्यांगांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रस, दारव्हा, नेर येथे दिव्यांग व्यक्तींसाठी नि:शुल्क कृत्रिम अवयव व साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिग्रस, दारव्हा, नेर येथे आरोग्य संकल्प अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी, उपचार व औषध वाटप शिबिराचे दर तीन महिन्यांनी नियमीत आयोजन करण्यात येते. या शिबिरादरम्यान अनेक दिव्यांग रूग्ण तपासणीसाठी येतात. या रूग्णांची गैरसाय बघून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्य वाटप करण्याची संकल्पना मांडली. आता पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुढील आठवड्यात २७ ते २९ जून दरम्यान हे शिबीर होणार आहे. या शिबिरात दृष्टीहीन, कर्णबधीर, मूकबधीर, अपंग आदी प्रकारच्या दिव्यांग बांधवांना ट्रायसिकल, व्हिलचेअर, कुबड्या, श्रवणयंत्र, अंधकाठी, कृत्रिम हात, पाय आदी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
हे शिबीर दिग्रस येथे गुरुवार, २७ जून रोजी, दारव्हा येथे शक्रवार, २८ जून रोजी आणि नेर येथे शनिवार, २९ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. माँ आरोग्य सेवा समितीने आयोजित केलेल्या या शिबिराचे व्यवस्थापन ओएएएलएमएसी यांनी केले आहे. दिव्यांग बांधवांनी दिग्रस, दारव्हा व नेर येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.