जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याची प्रक्रिया गतीमान – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या तरतुदीनुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. 2019 नंतर नोंदणीकृत सर्व नव्या वाहनांना निर्माता कंपन्यांकडूनच एचएसआरपी बसवून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य ॲड.अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेटच्या दरासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मंत्री सरनाईक यांनी उत्तर दिले.

मंत्री सरनाईक म्हणले की, आतापर्यंत 16,58,495 वाहनांनी एचएसआरपी साठी नोंदणी केली असून, त्यापैकी 3,73,999 वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रियेत कार्यक्षमतेसाठी तीन विभाग तयार करण्यात आले असून, वेगवेगळ्या क्लस्टरच्या माध्यमातून कामाचे नियोजन आखण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाने विविध राज्यांतील एचएसआरपी लावण्याच्या दरांबाबतही स्पष्टता यावेळी दिली आहे. महाराष्ट्र राज्यामधील दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहेत, असे परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले. उच्च सुरक्षा नंबर प्लेटच्या दरांमध्ये विसंगती असल्याचे आरोप होत आहेत. तरी सर्व पुरावे तपासून घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल. तथापि दरामध्ये बदल होणार नसल्याचेही परिवहन मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये दुचाकी वाहनासाठी एचएसआरपी बसविण्यासाठी रुपये 450 हा दर निश्चित करण्यात आला असल्याचे सांगून परिवहन मंत्री यांनी एचएसआरपी संदर्भात अन्य राज्यातील दराची माहिती दिली. दुचाकी वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी आंध्र प्रदेश – रुपये 451, आसाम – रुपये 438, बिहार – रुपये 451, छत्तीसगड – रुपये 410, गोवा – रुपये 465, गुजरात – रुपये 468, हरियाना – रुपये 468, हिमाचल प्रदेश – रुपये 451, कर्नाटक – रुपये 451, मध्य प्रदेश रुपये 468, मेघालय – रुपये 465, दिल्ली – रुपये 451, ओडिशा – रुपये 506, सिक्कीम – रुपये 465, अंदमान निकोबार – रुपये 465, चंडीगड – रुपये 506, दिव आणि दमण – रुपये 465, उत्तर प्रदेश – रुपये 451, आणि पश्चिम बंगाल – रुपये 506 असा दर आकारण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी वेगवेगळे दर असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

एचएसआरपी लावण्याची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना त्यांच्या वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

सरकारच्या या योजनेंतर्गत 2019 च्या पूर्वी नोंदणीकृत सुमारे 1.75 कोटी वाहनांना एचएसआरपी बसवली जाणार आहे. नागरिकांनी या प्रक्रियेस सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच सर्व वाहनांना एचएसआरपी बसवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, अशी खात्री परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी संघभूमी आणि दीक्षाभूमीवर होणार नतमस्तक

Wed Mar 26 , 2025
नागपूर :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदु नववर्षदिनी, गुढीपाडव्याला रविवार ३० मार्च रोजी नागपूर शहरात आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर आगमन झाल्यानंतर रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन, त्यानंतर दीक्षाभूमी आणि तिथून माधव नेत्रालय येथे जाणार आहेत. पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!