– उष्माघात प्रतिबंधासाठी मनपाद्वारे शहरात सर्वत्र उपाययोजना
नागपूर :- नागपूरात उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे उद्भवत असलेल्या उष्माघाताच्या धोक्यापासून वाचण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा विविध टप्प्यांवर कार्यरत असून ‘अलर्ट’ मोडवर आहे.
नागपुरातील वाढत असलेले तापमान बघता मनपातर्फे नागरिकांसाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाच्या सर्व विभागांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात आरोग्य विभाग, उद्यान विभाग, समाजविकास विभाग, जलप्रदाय विभाग,आपत्ती व्यवस्थापन विभागासह इतर सर्व विभागांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेत सर्व वैद्यकीय सेवा सज्ज करण्यात आल्या आहेत. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उष्मलाट बाधित व्यक्तींच्या उपचारासाठी मुबलक औषधींचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच उद्यान विभागातर्फे दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील सर्व उद्याने सुरु ठेवण्यात येणार आहेत. उद्यानांमध्ये नागरिकांसाठी विश्रांतीची जागा तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांना दिवसभर सुरू असलेल्या उद्यानांमध्ये सावलीचा आसरा घेता येणार आहे.
मनपातर्फे सर्व बांधकाम मजुरांना दुपारची सुट्टी देण्यात येणार आहे. तसे आदेश निर्गमित झाले असून त्याचे पालन सुद्धा करण्यात येत आहे. मनपाच्या समाज विकास विभागातर्फे बेघर नागरिकांची निवारा केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे इमारतीत, गोदामात अथवा कारखान्यात आग लागण्याच्या घटना बघता आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे अग्निशमन यंत्रणा वेळेवर उपलब्ध होईल याची सूचना देण्यात आली आहे. विद्युत विभागातर्फे दुपारच्या वेळी वीज जाणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे. परिवहन विभागानेही शहर बस स्थानकांवर सावली व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
अशी घ्या काळजी
नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघायचे टाळावे. उन्हात जाण्याचे वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा.
हे करणे टाळा
उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका, गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावे, उन्हात स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिक्या उघडी ठेवावीत, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावी, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.