कोल्हापूर :- महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आणि यासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा.धनंजय महाडिक, खा.धैर्यशील माने, आ.डॉ.विनय कोरे, आ.अशोकराव माने, आ.अमल महाडिक, आ.राहुल आवाडे, आ.शिवाजी पाटील, आ.गोपिचंद पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण या ठिकाणी आहोत. त्यांनी हिंदवी स्वराज्य हे अटकेपार उभारण्यासाठी काम केलं. या सर्व इतिहासामध्ये पन्हाळगडाचे महत्व वेगळे आहे. पन्हाळगडाचा इतिहास या १३ डी च्या माध्यमातून जगता येणार आहे. यातलं महत्त्वाचं काही असेल तर युद्धाच्या रणभूमीवर आपण आहोत अशा प्रकारचा अनुभव मिळतो. शिवकालीन इतिहास केवळ वाचण्यापुरता नाही तर तो अक्षरशः जगण्याकरताही आहे. ज्या तज्ज्ञांनी हे काम केलं त्यांचे आभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मानले.
पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देण्याची घोषणा
आमदार विनय कोरे यांच्या पुढाकाराने जोतिबा मंदिर विकास आराखडा अतिशय सुंदर तयार झाला आहे. त्याला मान्यता दिली आहे पण त्याचं प्राधिकरण झालं पाहिजे ही मागणी आहे. यावर बोलताना येत्या पंधरा दिवसांमध्येच प्राधिकरण स्थापन करून देतो अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट केलेले आहेत. याबाबत दुसरे सादरीकरण करण्याकरता मे २०२५ मध्ये मी स्वतः पॅरिस येथे जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १३ डी थिएटर आणि परिसराचे कौतुक करून सर्व विधानसभा सदस्यांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आणू असे सांगितले. पन्हाळगडचा रणसंग्राम लघुपट व १३ डी थिएटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळगड येथे कोनशिला अनावरण व फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी शिवकालीन शस्त्रे, मुद्रा, नाणी, शिवरायांची वेशभूषा आदींची पाहणी केली. तद्नंतर त्यांनी पन्हाळगडाच्या इतिहासाबाबत माहिती देणारी चित्रफीत पाहून पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट पाहिला.