– विजयकाका पोफळी लिखित ‘तपोनिधी’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
नागपूर :- पंडितकाका धनागरे महाराजांनी आपले जीवन भक्तीमार्गाला समर्पित केले होते. समाज संस्कारित करून आपला विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. विजयकाका पोफळी यांनी पंडितकाका धनागरे महाराजांचे जीवनचरित्र ‘तपोनिधी’मधून मांडले आहे. हे जीवनचरित्र तरुणांना नक्कीच प्रभावित करेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी (रविवार) येथे व्यक्त केले.
विजयकाका पोफळी लिखित प. पू. श्री पंडितकाका धनागरे महाराज यांचे जीवनचरित्र ‘तपोनिधी’च्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन श्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर विजयकाका पोफळी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘माझ्या बालपणी माझा पंडितकाका धनागरे महाराजांशी जवळचा संबंध आला. माझ्या आईशी आणि आमच्या कुटुंबाशी त्यांचे विशेष ऋणानुबंध होते.
नर्मदा प्रदक्षिणा केल्यानंतर त्याचे वर्णन त्यांनी माझ्या आईकडे केले होते. ते वर्णन प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिला मिळाली. त्यांचे विचार ऐकण्याची उत्सुकता पूर्वीच्या तरुणांमध्येही होती. आजही त्यांचे जीवनचरित्र वाचून तरुण पिढीला नक्कीच दिशा मिळेल.’ विजयकाका पोफळी यांचं पंडितकाका धनागरे महाराजांसोबत विशेष नातं होतं. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच विजयकाकांनी भक्तीमार्गाचा ध्यास घेतला. धनागरे महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठीच त्यांनी जीवन समर्पित केलं. आज वाशीममध्ये त्यांचे कार्य उत्तमरित्या सुरू आहे. धनागरे महाराजांचे विचार, त्यांचे दिशादर्शन समाजापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य ‘तपोनिधी’च्या माध्यमातून होईल, असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला. गोविंददेव गिरी महाराज राष्ट्रीय विचारांशी समर्पित असून त्यांच्या विचारांनी तरुणशक्तीला प्रभावित केलेले आहे, असेही ना. गडकरी यांनी आवर्जून नमूद केले.
पंडितकाका धनागरे यांनीच माझ्याकडून चरित्र लिहून घेतले, अशी भावना विजयकाका पोफळी यांनी व्यक्त केली. पंडितकाका धनागरे यांनी मला कधी आत्मीय मित्रवर्य, कधी बंधू, कधी शिष्य तर कधी पुत्र म्हणून संबोधले. गुरुकृपा काय असते, याचा अनुभव त्यांनी मला दिला, असेही ते म्हणाले.
संतांची चरित्र जीवनाचं सोनं करतात – गोविंददेव गिरी महाराज
ज्या लोकांच्या सहवासात राहून, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जीवनाचे सोने होते, अशांची चरित्र माझ्यादृष्टीने संतचरित्र असतात. केवळ भगवंताचे गुणगान गाऊ नये. ज्याला धर्माच्या मार्गावर चालायचे असेल त्याला संत चरित्र देखील वाचावी लागतील, असा आदेश आमच्या पूर्वासुरींनी दिला, असे गोविंददेवगिरी महाराज म्हणाले. वेदांनी धर्मशास्त्राची तत्त्व शिकवली. पण ती अंगीकारायची असतील तर महाभारत, रामायण वाचावे लागेल, असेही ते म्हणाले.